मुंबई- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या भाजपच्या कोट्यातील एकमेव जागेसाठी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना महाराष्ट्रातूनच पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकाश जावडेकर यांना छत्तीसगडमधून राज्यसभेत पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
प्रदेश भाजपची आज दुपारी मुंबईत बैठक झाली. यात रामदास आठवले, उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपचे गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे उपस्थित होते. या बैठकीत रामदास आठवलेंना महाराष्ट्रातून पाठवणे कसे फायद्याचे आहे यावर चर्चा झाली तर, जावडेकर राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना इतर राज्यातून पाठविले तरी काही हरकत नाही व वेगळा संदेशही जात नाही अशी बैठकीत चर्चा झाली.
शुक्रवारी दिल्लीत या दोघांच्या नावावरून तब्बल तीन तास काथ्याकूट करूनही निर्णय घेता आला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दलित मते महत्त्वाची असून, रामदास आठवले यांना महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवावे असे मत मुंडे गटाने व्यक्त केल्याचे कळते. तसेच जावडेकरही पक्षाचे महत्त्वाचे नेते असून, त्यांना छत्तीसगडमधून राज्यसभेत पाठवावे असे सांगितल्याचे कळते.
आठवले यांना आताच राज्यसभेवर पाठवले तर दलित समाजात योग्य तो संदेश जाईल व एकूनच महायुतीला फायदा होईल असे मत मुंडेंसह उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंह यांना आठवलेंना राज्यसभेवर पाठविण्याबाबत चर्चा केली आहे तसेच ते किती गरजेचे आहे हे सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वावर सेनेसह राज्यातील फडणवीस-मुंडे यांचाही दबाव आहे. आठवलेंना जर आता संधी दिली नाही तर महायुतींबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित केली जावू शकेल. दलितांत पण नकारात्मक संदेश जाईल यामुळे महायुतीला फटका बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून रामदास आठवले यांची वर्णी लावण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment