प्रसाधनगृहांची परवड : रेल्वेकडे निधी नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2014

प्रसाधनगृहांची परवड : रेल्वेकडे निधी नाही

6 / 1 / 2014  http://jpnnews.webs.com
मुंबई : उपनगरीय रेल्वेचा विस्तार झपाट्याने होत आहे. हा विस्तार जितक्या झपाट्याने होत आहे, तितक्याच समस्यांना प्रवाशांना समोरे जावे लागत आहे. सर्वात बिकट अवस्था आहे ती प्रसाधनगृहांची. मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ७0 लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु मध्य रेल्वे मार्गावरील प्रसाधनगृहांची स्थिती अत्यंत दयनीय असून त्यांची संख्याही अपुरी आहे. रेल्वे मार्गावर प्रसाधानगृहे बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याचेही रेल्ेवकडून सांगण्यात येते. अपुर्‍या निधीमुळे रेल्वे प्रशासनाने प्रसाधनगृह बांधण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे काम खाजगी क ॉर्पोरेट कंपन्यांना दिले असले तरी त्यांनीही आता त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे रेल्वे पुन्हा एकदा इरादापत्र प्रक्रिया स्वीकारणार असल्याचे समजते.

उपनगरीय लोकल मार्गावर प्रत्येक रेल्वे स्थानकावर एक शौचालय आणि दोन मुतार्‍या असणे बंधनकारक आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवर त्या अस्तित्वात असल्या तरी प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर एक शौचालय आणि मुतारी जादा बांधण्याची आवश्यकता आहे; परंतु सध्या मध्य रेल्वेकडे निधी नसल्याने ते शक्य नाही. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात फक्त तीनच प्रसाधनगृहे आहेत. दोन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर (मुंबई आणि कल्याण टोकाला) तर एक प्लॅटफॉर्म क्रमांक १0 वर. ठाण्याला सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या या प्लॅटफॉर्म क्रमांक ५, ६, ७ आणि ८ वर थांबतात. मात्र या प्लॅटफॉर्मवर एकही प्रसाधनगृह नाही. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर मेल-एक्स्प्रेसची वाट पाहणार्‍या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन गाडीची वाट पाहावी लागते. 

माटुंगा, करी रोड, चिंचपोकळी, परळ, विद्याविहार या स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या अगदी शेवटी एका कोपर्‍यात प्रसाधनगृहे आहेत. यापैकी करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकांवरील प्रसाधनगृहे हे रेल्वे रुळांच्या अगदी नजीक असल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रवाशांना लोकल गाडीला अगदी खेटून जावे लागते. तसेच सीएसटी स्थानक हे आंतराराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक असले तरी प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७च्या समोर एकच प्रसाधनगृह आहे, तर कळवा, दिवा या स्थानकांतील प्रसाधनगृहे ही असूनही नसल्यासारखीच आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उपलब्ध आहे त्या प्रसाधनगृहांची तरी स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, अशी माफक अपेक्षा रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS