रिलायन्स मेट्रोच्या फलकाला काळे फासले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

रिलायन्स मेट्रोच्या फलकाला काळे फासले



9/1/2014
मुंबई : मुंबईचे वैशिष्ट्य ठरणार्‍या मेट्रो प्रकल्पाला मुंबई मेट्रो असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी रिपाइंच्या आठवले गटाच्या वतीने बुधवारी अंधेरी मेट्रो रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आले. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स मेट्रोच्या फलकाला काळे फासून आपला विरोध व्यक्त केला.

दुपारी चारच्या सुमारास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन अंधेरी मेट्रो स्थानकावर दाखल झाले. कार्यकर्ते पायर्‍यांवरून स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर चढले. त्यानंतर तिथे असलेल्या रिलायन्सच्या फलकाला कार्यकर्त्यांनी काळे फासले. रिलायन्सच्या फलकाला काळे फासल्यानंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे बॅनर्स लावले. या वेळी आंदोलकांनी रिलायन्सविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रिलायन्सची मुजोरी थांबवण्याची मागणी केली. 

मेट्रो प्रकल्पाचे नाव मुंबई मेट्रो असं असताना रिलायन्स स्वत:चेच नाव झळकावत आहे. दोन वेळा एमएमआरडीएनेदेखील सूचना दिल्या; पण तरीही रिलायन्सची मुजोरी थांबत नसल्याने त्याचा निषेध म्हणून आरपीआयच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी याप्रकरणी रिलायन्स प्रमुख अनिल अंबानी यांना आपण भेटणार असल्याचेही एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मेट्रो रेल्वेला मुंबई मेट्रो असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित स्थानकाजवळ रिपब्लिकन पक्ष स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. या मागणीला पाठिंबा म्हणून मुंबईकरांच्या मिळालेल्या स्वाक्षरीचे निवेदन एम.एम.आर.डी.ए चे अध्यक्ष असणार्‍या मुख्यमंत्र्यांना येत्या ७ दिवसांत सादर करण्यात येईल, असे आठवलेंनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS