मुंबई : महिला आयोगाने यापूर्वी घेतलेल्या पोलीस प्रशिक्षण कार्यक्रमाप्रमाणेच महिलांना सहकार्य करण्यास मदत होईल असे उपक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करीत महिला आयोगाच्या अध्यक्षा अँड़ सुसीबेन शाह यांनी आयोगातील तक्रारी लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आयोग तत्परतेने कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. महराष्ट्र राज्य महिला आयेागामार्फत पार पडलेल्या दोनदिवसीय जनसुनावणीदरम्यान त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, पोटमाळा, कलानगर, वांद्रे येथे सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान पार पडलेल्या जनसुनावणीत कौटुंबिक वाद, मालमत्ता प्रकरणे, हुंड्याकरिता छळ, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ इत्यादी प्रकारच्या तक्रारींची दखल घेण्यात आली. या तक्रारींवर न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी विधी व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. आयोगातील समुपदेशक नि प्रकल्प अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे वकील अशा प्रकारचे एकूण ५ पॅनल तयार करण्यात आले. विषयवार कक्ष उभारण्यात आले व प्रत्येक कक्षात या पॅनलद्वारे विविध विषयांच्या तक्रारी हाताळण्यात आल्या. तसेच आयोगाच्या अध्यक्षा व सदस्या यांनी तक्रारदार, गैरअर्जदार यांना मार्गदर्शन केले.
महिलांच्या बाबतीत पिळवणूक, उपद्रव आणि अत्याचाराचा प्रसंग आयोगाच्या निदर्शनास येताच महिला आयोग संबंधित शासकीय/पोलीस अधिकार्यांसोबत संपर्क साधून योग्य तपास होण्यासंदर्भात व गुन्हेगारास कायदेशीर कार्यवाही होण्यासंबंधी आग्रहाची भूमिका घेत असल्याचे कार्यक्रमादरम्यान स्पष्ट करण्यात आले. या वेळेस महिला आयोग अध्यक्षांसह सदस्य सचिव शोमीता बिस्वास व अन्य सदस्या., विधी व न्याय विभागाचे सचिव ए. व्ही. गुजराथी व महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष पुणे, पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार वर्मा उपस्थित होते.


No comments:
Post a Comment