मुंबई - देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांबाबत संप करण्याबाबत काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी 17 व 18 जानेवारीला एनएफआयआर या संघटनेतर्फे देशभरात मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी झाली असून 82 हजार 693 जणांनी यामध्ये मतदान केले व त्यापैकी 80 हजार 460 जणांनी संपाला अनुकूल मतदान केले आहे. मतदान केलेल्यांपैकी 97.3 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाबाबत अनुकूल निर्णय दिला आहे. देशव्यापी संपाबाबत कर्मचारी संघटनांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस जी. जी. माहूरकर यांनी दिली. मुंबई, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, भावनगर व रतलाम येथील मतदानाची मतमोजणी मुंबईत झाली.
50 टक्के महागाई भत्त्याला मूळ वेतनामध्ये समाविष्ट करावे, स्टेशन मास्टरचे प्रवेशावेळचे ग्रेड वेतन 4200 रुपये व्हावे, सध्या त्यांना 2800 ची वेतनश्रेणी देण्यात आली आहे. वरिष्ठ अनुभाग अभियंत्यांना सध्याच्या 4600 च्या वेतनश्रेणीऐवजी 4800 वेतनश्रेणी देण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे पाठविला आहे; मात्र अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. रेल्वेतील स्टेनोग्राफरची वेतनश्रेणी 2800 आहे आणि रेल्वे बोर्डामध्ये कार्यरत स्टेनोग्राफरची वेतनश्रेणी 4200 आहे. वेतनश्रेणीतील ही तफावत दूर करावी व दोघांना समान वेतनश्रेणी द्यावी, मेल-एक्स्प्रेस लोको पायलट व गार्डना 4600 ची वेतनश्रेणी द्यावी, यासह विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी संप करण्याचा संघटनेचा विचार आहे.


No comments:
Post a Comment