पालिकेचा श्रीमंतांना वेगळा न्याय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2014

पालिकेचा श्रीमंतांना वेगळा न्याय

भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबई मधील सर्व नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महानगर पालिकेची आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार आणि प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. असे असतानाही मुंबई महानगर पालिकेकडून श्रीमंत आणि गरीबांमध्ये भेदभाव केला जात असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. 

मुंबईकर नागरिकांना मुंबई महानगर पालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. परंतू कित्तेक लोक पाण्याचे बिल भरत नसल्याने पाण्याच्या बिलाची मोठी थकबाकी विविध व्यक्ती, संस्था, सरकारी कार्यालये यांच्याकडे आहे. अशा थकबाकीदारांत कोण कोण आहे याची माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश गुप्ता यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवली होती. महाराष्ट्राचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पाणी थकवणा  अशा मिळवली. मुंबई शहरात दोन लाख १ हजार ९०८ लोकांकडे १०७१ कोटी १४ लाख ४७ हजार ३३७ रुपयांची केवळ पाणीपट्टी थकबाकी आहे. पालिकेद्वारे नुकतीच पाण्याचे बिल थकवणाऱ्या नागरिकांची यादी पालिकेच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली आहे. 

या थकबाकीदारांच्या यादीत पालिकेमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेचे प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, सुप्रसिध्द सचिन तेंडुलकर आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरील ‘मातोश्री’ या बंगल्याचे पाण्याचे एक लाख रुपये थकले आहे. सचिन तेंडुलकर याचासुद्धा बराच पाणी कर येणे बाकी आहे. अबु आझमी यांच्या गल्फ हॉटेलसाठी घेतलेल्या पाण्याचे बिल दिलेले नाही. ही गोष्ट उघड झाली तेव्हा अबु आझमी यांनी आपले पाण्याचे बिल भरले असल्याचे आणि नजरचुकीने आपले नाव जाहीर झाले असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर खटला भरणार आहोत असा इशारा आझमी यांनी दिला आहे.  

पालिकेच्या जलविभागाने थकबाकीदारांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये मध्ये सर्वाधिक थकबाकीची रक्कम असलेल्या ५०० ग्राहकांची वेगळी यादी बनवण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’च्या नावावर १ लाख १५ हजार ६२५ रुपयांचे पाणीबिल थकीत आहे. मात्र यावर स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मातोश्रीचे पाण्याचे बिल थकीत नसल्याचा दावा केला होता. मात्र थकबाकीदारांच्या यादीत नाव आल्याने शिवसेनेचे नेते खवळले आहेत. मातोश्रीचे नाव आले कसे, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

पालिकेच्या थकबाकीदारांच्या यादीत अनेक मोठे हॉटेल्स, अनेक सरकारी आणि निमसरकारी कार्यालये यांचा समावेश आहे. पालिकेची कोटय़वधी रुपयांची थकबाकी जर थकत असेल तर या पालिकेचा आर्थिक गाडा कसा चालणार आहे, याचा विचार सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला नाहीच पण उलट थकबाकीदारांच्या यादीतले बाळासाहेबांचे नाव जाहीरच कसे झाले म्हणून उद्धव यांनी पालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना झापले आहे. 

पाणी बिलाच्या थकबाकीदारांच्या यादीत ‘मातोश्री’चा उल्लेख आल्याने ठाकरे कुटुंबीयांच्या झालेल्या बदनामीमुळे ‘मातोश्री’च्या पाण्याची बिले भरल्याचा दावा करत शिवसेनेने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी ही बदनामी त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.याचा वचपा काढण्यासाठी पाणीबिल थकवणा-या सर्व सरकारी कार्यालयांचा पाणीपुरवठा तोडण्याचे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

राज्य, केंद्र सरकार, पीडब्ल्यूडी, गृहखाते, म्हाडा, पश्चिम व मध्य रेल्वेकडे तब्बल ९० कोटी रुपयांची थकबाकी असून, ही थकबाकी त्वरित वसूल करा, अन्यथा त्यांचा पाणीपुरवठा बंद करा, असे आदेशच महापौर प्रभू यांनी दिले आहेत. थकबाकीदारांच्या यादीत असलेल्या सर्व सरकारी कार्यालयांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या जाहिराती मधून लोकांना पाणी वाचवा असा संदेश देणारा भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर सुद्धा या थकबाकीदारांच्या यादी मध्ये आहे. क्रिकेटच्या माध्यमाने आपले अफाट पैसे मिळवणारा, भारतरत्न किताबाने गौरवलेला हा क्रिकेटर पालिकेचे पाण्याचे बिल भरू शकत नाही हीच शरमेची बाब आहे. पाण्याच्या थकबाकी असलेल्या क्रिकेटरकडून पालिकेने मुंबईकर नागरिकांना पाणी वाचवण्याचा संदेश देणे हे सुद्धा हास्यस्पद वाटत आहे. 

पालिकेतर्फे दरमहा आणि प्रत्येक तीन महिन्याने थकबाकीची बिले पाठवली जातात. ज्यांची बिले मासिक १५ हजार रुपयांहून अधिक असतात त्यांना नो‌टिसा पाठवल्या जातात. नोटीस दिल्यानंतर तीन दिवसात बिल भरण्याची मुदत दिली जाते. न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जातो. अन्यथा ४५ दिवसांनंतर कायदेशीर कारवाई केली जाते. असा अनुभव सामान्य गरीब मुंबईकर नेहमी घेत असतात. सामान्य गरीब मुंबईकर नागरिकांना लागू असलेला कायदा श्रीमंत असलेल्या सेलिब्रिटी व राजकारण्यांना लागू नसल्यानेच असे प्रकार होत आहेत. पालिकेच्या जल विभागाने व पालिका आयुक्तांनी सर्व मुंबईकर नागरिकांना एकच कायदा लागू असल्याचा संदेश देण्यासाठी पाण्याच्या थकबाकीदारांचे पाण्याचे कनेक्शन तोडण्याची हिम्मत दाखवण्याची गरज आहे. 
अजेयकुमार जाधव (मो.-0९९६९१९१३६३)

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS