भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापरिनिर्वान दिनी दादर चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असतात. येणाऱ्या २० ते २५ लाख लोकांना पाणी, आरोग्य, लांबून आलेल्या अनुयायांना राहण्यासाठी तात्पुरता स्वरूपातील तंबू, भंतेजीसाठी निवारा, स्वच्छता, इत्यादी नागरी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महानगर पालिकेकडून पुरविण्यात येत असतात.
मुंबई महानगर पालिकेकडून या सर्व नागरी सुविधा देण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केली जाते. मुंबई महानगर पालिकेने सन २०१३ - १४ च्या अर्थसंकल्पामध्ये महापरिनिर्वान दिनासाठी २ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. तसा अर्थसंकल्पामध्ये उल्लेख असून महापरिनिर्वान दिनासाठी २ कोटी रुपये खर्च येत असल्याचे पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी अर्थसंकल्प सदर करताना आपल्या भाषणात म्हटले आहे.
सतत वाढणारी महागाई पाहता पालिकेकडून अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणारी आर्थिक तरदूत कमी असल्याने गेल्या काही वर्षामध्ये पालिकेच्या शिवाजी पार्क येथील पालिकेचा नियंत्रण कक्ष, लांबून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी बांधण्यात येणाऱ्या तंबूचे आकारमान छोटे होत गेले आहे. असाच प्रकार इतर सेवांबाबत आहे. निधी कमी पडत असल्याने मिळालेल्या निधी मध्ये जमेल तशी सुविधा दिली जात आहे. यामुळे आंबेडकरी जनतेला महापरिनिर्वान दिनी पाहिजे तशी सुविधा मिळत नाही.
नुकत्याच संपन्न झालेल्या ५७ व्या महापरिनिर्वान दिनी दादर चैत्यभूमी येथे आलेल्या आंबेडकरी अनुयायांसमोर मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी महापरिनिर्वान दिनासाठी अर्थसंकल्पामध्ये भरघोस (दुप्पट) तरतूद करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्याला कारण सुद्धा तसे होते त्यांच्या सोबत शिवसेनेकडून मध्य मुंबई लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढवणारे पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे सोबत होते. लवकरच निवडणुका असल्याने आपल्या शिवसेनेच्या उमेदवाराला आंबेडकरी समाजातील मतदारांची मते मिळावी म्हणून अशी घोषणा करण्यात आली होती असेच आता म्हणवे लागत आहे.
नुकतेच पालिकेचे सन २०१४ -१५ या आर्थिक वर्षासाठी ३१ हजार कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्यात आले आहे. महापौर सुनील प्रभू यांनी केलेल्या घोषाणे प्रमाणे महापरिनिर्वान दिनासाठी कोणतीही भरघोस तरतूद करण्यात आलेली नाही. पुढी वर्षासाठी फक्त ११३ लाख रुपयांची म्हणजेच १ करोड १३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे सन २०१३- १४ मध्ये हीच तरतूद २ कोटी रुपये इतकी होती. महापौरांनी निवडणुका डोळ्या समोर ठेवून घोषणा केली परंतु शिवसेनेच्या "करून दाखवले" या जाहिराती प्रमाणे महापौरांना आर्थिक तरतूद करून घेता आलेली नाही.
महापरिनिर्वान दिनी आंबेडकरी जनतेला पालिकेकडून चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन समन्वय समिती" कार्यरत आहे. या समन्वय समितीने आंबेडकरी जनतेला चांगल्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरघोस निधी वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना बाबासाहेबांच्या नावाने पालिकेमध्ये घोटाळे करणाऱ्या अधिकाऱ्यांची हाजी हाजी करण्यात व जेवणाच्या पार्ट्या झोडण्यात समितीचे सदस्य गुंग आहेत. हाजी हाजी करण्याच्या अशा वृत्तीमुळे महापरिनिर्वान दिनी येणाऱ्या लाखो लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळत नाही असा आरोप आंबेडकरी जनतेमधूनच केला जात आहे.
एकीकडे समन्वय समितीची अशी अवस्था असताना पालिकेमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेच्या महायुती मध्ये सामील झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाकडे पालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष पद आहे तसेच नुकतेच राज्यसभेवर रामदास आठवले यांना महायुतीने पाठवले आहे. आठवले गटाला महापरिनिर्वान दिना साठी दिला जाणारा निधी अर्धा झाला तरी याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे समजते.
महापौर सुनील प्रभू यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. पालिकेने महापरिनिर्वान दिना साठी भरघोस तरतूद करायचे सोडून निधी देण्यामध्ये कुचराई केली आहे.यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महायुतीच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. महापौर सुनील प्रभू यांनी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून घोषणा केली असली तरी हि घोषणापूर्ण होऊ शकलेली नसल्याने येत्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही.
शिवसेना, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महायुती कडून आंबेडकरी जनतेला मूर्ख बनववून मत मिळवण्यासाठी महापरिनिर्वान दिन निधी मध्ये भरघोस निधीची तरतूद करण्यासारखी मोठ मोठी आश्वासने आणि घोषणा केल्या जाण्याची शक्यता असल्याने या घोषणा आणि आश्वासनांची सत्यता तपासण्याची गरज आहे. यासाठी येणाऱ्या निवडणुकी दरम्यान आंबेडकरी जनतेला जागृत राहण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment