पालिका आयुक्तांविरोधात काँग्रेस अविश्‍वास ठराव मांडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2014

पालिका आयुक्तांविरोधात काँग्रेस अविश्‍वास ठराव मांडणार

मुंबई : पालिकेच्या परिमंडळ तीनचे उपायुक्त रमेश पवार यांची सहाय्यक आयुक्तपदी पदावनती करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले आणि त्यांचा कारभार मनमानी आहे, असा आरोप करून त्यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव आणण्यात येईल, असे पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी समितीच्या बैठकीत सांगितले. तसेच त्यांच्या या कारभाराचा निषेध करून समितीची बैठक झटपट तहकूब करण्यात आली. आंबेरकर यांनी आयुक्तांविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडल्यास त्याला पाठिंबा देण्यात येईल, असे पालिकेतील सत्तारूढ पक्षाच्या आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी जाहीर केले. 
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंगळवारी काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये पवार यांचाही समावेश आहे. त्यांची बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी पदावनती करण्यात आली. पवार यांची नियुक्ती करण्यापूर्वी पालिका सभागृहाची अनुमती घेतली, पण त्यांची पदावनती करताना सभागृहाची संमती घेतली नाही, असा आरोप आंबेरकर यांनी केला. 'पवार हे कर्तव्यदक्ष अधिकारी व सक्षम, चांगले अधिकारी असताना आयुक्तांनी त्यांची मनमानीपणे आणि सूडबुद्धीने बदली केली,' असे ते म्हणाले. स

माजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते धनंजय पिसाळ, भाजपाचे अमित साटम, काँग्रेसचे प्रवीण छेडा आणि असिफ झकेरिया यांनी आंबेरकर यांच्या झटपट तहकूबीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या वेळी आयुक्तांनी पवार यांच्यासह अन्य पालिका अधिकार्‍यांच्या केलेल्या बदल्या योग्य व सर्व नियमांची अंमलबजावणी करून झाल्या आहेत, असे सांगून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी बदल्यांचे सर्मथन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS