पालिकेच्या रुग्णालयांत तंबाखूलाही नो एंट्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2014

पालिकेच्या रुग्णालयांत तंबाखूलाही नो एंट्री

मुंबई - महापालिका रुग्णालयांमध्ये धूम्रपानास बंदी आहे; परंतु तंबाखू वा पानमसाला खाऊन इथेतिथे पिचकारी मारणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अशा बेफिकीर वृत्तीच्या व्यसनाधीनांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यानुसार पालिकेच्या सर्व रुग्णालयांत तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांना मज्जाव करण्यात येणार आहे. तसे फलकही रुग्णालयांत लावण्यात येतील. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईही होणार आहे. रुग्णालयाची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी अशा दुहेरी हेतूने त्याची अंमलबजावणी होईल. महापालिका रुग्णालयाच्या संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांनी बंदीबाबत माहिती दिली. 
टाटा कॅन्सर रुग्णालय, ऍक्‍शन कौन्सिल अगेन्स्ट टोबॅको आणि हेलिस यांच्यातर्फे झालेल्या एका चर्चासत्रात तंबाखूचे दुष्परिणाम सांगण्यात आले. सिगारेटपेक्षा तंबाखूचे सेवन अधिक होते. गुटखा, जर्दा, खैनी आणि पानमसाल्यातून तो खाल्ला जातो, असे मुद्दे त्यात मांडण्यात आले.टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, की 65 टक्के व्यक्ती तंबाखू चघळतात. तोंडाचा कॅन्सर रोखण्यासाठी अशा पदार्थांवर बंदी आणणे गरजेचे आहे. डॉ. नागदा यांनी पालिका रुग्णालयांत अशी खबरदारी घेणे शक्‍य असल्याचे सांगत त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. यासंदर्भात महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि पालिका आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना पत्र लिहिणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

पालिका रुग्णालयांत सिगारेट आणि विडी ओढण्यावर बंदी आहे. त्यानुसार तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांना मज्जाव करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात येईल, असे नागदा यांनी सांगितले. रुग्णालयात तसे फलक लावण्याची परवानगी मिळाल्यास त्याचा रुग्णालय, रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालय परिसरातील स्वच्छतेला फायदा होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. महापालिकेने त्यास मान्यता दिल्यास कारवाई करताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कोणतीही बंधने नसतील. आधी पालिकेची परवानगी घेऊन मगच कारवाई करण्यावर भर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालिकेतील आवश्‍यक ती मंजुरी घेतल्यानंतर त्यासंदर्भातील अधिसूचना पालिका रुग्णालयांना पाठवण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. 

Post Bottom Ad

JPN NEWS