बेस्टला सौरऊर्जा पुरवठादार मिळत नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2014

बेस्टला सौरऊर्जा पुरवठादार मिळत नाही

मुंबई - अपारंपरिक ऊर्जाखरेदीचे बंधन असल्याने सौरऊर्जा खरेदीसाठी वणवण फिरणाऱ्या बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाला सौरऊर्जा पुरवठादारच मिळत नसल्याचे समोर आले आहे. अकॉड पॉवर कंपनीसोबतचा करारही बेस्टने रद्द केला आहे. 
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशात 2010-11 ते वर्ष 2015-16 पर्यंतचे सौरऊर्जा खरेदीचे लक्ष्य पूर्ण करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सहा वर्षांसाठीची 122 दशलक्ष युनिट सौरऊर्जेची आवश्‍यकता आहे. त्यासाठी बेस्टने सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांकडून 30 मेगावॉट विजेसाठी 25 वर्षांचा करार करण्याचे ठरले. त्यामध्ये वेलस्पन एनर्जी महाराष्ट्र प्रा. लि.ने 20 मेगावॉटच्या करारासाठी स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या शर्थींची पूर्तता केली, तर अकॉड पॉवर मात्र यात अयशस्वी ठरली. अकॉड पॉवरला कारणे दाखवा नोटीसही पाठविण्यात आली; परंतु ही खूपच नवीन असल्याचे बेस्टला आढळले. तसेच आयोगाने मंजूर केलेल्या 7.69 रुपये प्रतियुनिटपेक्षा अकॉड पॉवरचा दरही 9.51 रुपये प्रतियुनिट इतका होता. त्यामुळेच बेस्टने या कंपनीसोबतचा करार रद्द केला. 

बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अकॉड पॉवरला देण्यात आलेली सौरऊर्जा पुरवठ्यासाठीची मान्यता रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बेस्ट उपक्रमानेही सौरऊर्जा खरेदीसाठीची प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी सूचना बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी या वेळी मांडली. बेस्टला 2015 अखेरपर्यंत एकूण वीजखरेदीमध्ये नऊ टक्के (522 दशलक्ष युनिट) ऊर्जा ही नूतनशील स्त्रोतांच्या माध्यमातून खरेदी करण्याचे लक्ष्य आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS