टेकडीवरील कचरा हटवण्याची मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2014

टेकडीवरील कचरा हटवण्याची मोहीम

मुंबई - मुंबईत जागा मिळेल तिथे घरे उभी राहिली; डोंगरकपारीतही वस्त्या वसल्या. त्यामुळे डोंगरउतारावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. घाटकोपर येथील भीमनगर भागातील टेकडीवरील कचरा हटवण्याची मोहीम गुरुवारी (ता. 10) हाती घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी गिर्यारोहकांच्या सह्याद्री ऍडव्हेंचर क्‍लब या संस्थेने पुढाकार घेतला आहे. 

घाटकोपर-पश्‍चिमेकडे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. या वस्त्यांमधील रहिवासी तेथेच कचरा टाकतात. झोपडपट्ट्यांमधील कचरा साफ करण्यासाठी महापालिका खासगी संस्थांची मदत घेत असली तरी डोंगरउतारावरील कचरा साफ करणे अवघडच आहे. ही समस्या ध्यानात घेऊन सह्याद्री ऍडव्हेंचर क्‍लबचे पथक घाटकोपर येथील भीमनगर भागातील कचरा हटवण्यास उद्या सकाळी सुरुवात करील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईतील डोंगर-टेकड्यांवरील कचऱ्याची याच पद्धतीने साफसफाई करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

नव्यानेच सुरू झालेल्या दिमाखदार मेट्रोचा मार्ग याच भागातून जातो. आलिशान मेट्रो रेल्वेतून जाताना प्रवाशांना कचऱ्याचे ढीग दिसतात. या डोंगरउतारावरील कचरा हटवण्यासाठी गिर्यारोहकांची मदत घेण्याची संकल्पना महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मांडली होती. त्याबाबत एन विभाग कार्यालयातील सहायक आयुक्त विजय कांबळे यांनी "सह्याद्री‘शी चर्चा केली. हे आगळेवेगळे आव्हान या संस्थेने स्वीकारले आहे.
डोंगरी वस्त्या
- मुलुंड ते घाटकोपर
- कुर्ला-पूर्व
- खार, अंधेरी, जोगेश्‍वरी

Post Bottom Ad

JPN NEWS