अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे डी कंपनीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शहरातील अवैध कारवायांची आणि डी कंपनीची धुरा इक्बाल कासकरकडे देण्याच्या हालचाली डी कंपनीत जोरदार सुरु झाल्याची माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. हसीनाच्या निधनाने शहरातील डी कंपन्क्या कारभारात इक्बाल कासकरने लक्ष घालावे यासाठी डी कंपनीत जोराता खल सुरू झाला आहे.
दाऊद जरी आपला भाऊ असला तरी त्याच्या अवैध व्यवसाय आणि कारभारापासून आपण दूर असल्याचे चित्र आतापर्यंत इक्बालने रंगविले आहे. मात्र छुप्या पद्धतीने तो हसीनाबरोबर दाऊदचा कारभार पाहत असल्याचे यापूर्वी पोलीस तपासात निदर्शनास आले होते. क्राफर मार्केट परिसरातील सारा-सहारा मॉलच्या जागेत जवळपास निम्म्याहून अधिक दुकानांवर दाऊद आणि इक्बालची मालकी होती. याप्रकरणी इक्बालला अटकही झाली होती. मात्र त्यातून सुटका झाल्यानंतर आपण त्या गावचे नसल्याचा आव इक्बालने आणला होता.
17 मे 2011 मध्ये छोटा राजनच्या हस्तकांकडून इक्बाल राहत असलेल्या पाकमोडिया स्ट्रेट परिसरात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात इक्बालचा अंगरक्षक असिफ बैल मारला गेला. त्यानंतर राजनने हा हल्ला इक्बाल कासकरवर नसून, त्याच्या अंगरक्षकावर असल्याचे जाहीर केले होते.
या प्रकरणामुळे इक्बाल दाऊदशी संबंधित व्यवहार सांभाळत असल्याचे स्पष्ट झाले. हसीना ही महिला असल्याने, तिच्या नावाने दिली जाणारी धमकी आणि उकळलेला खंडणीसंबंधीची कारवाई जरी झाली तरी, पोलिसांना नमते घ्यावे लागत असे. कारण हसीना ही एक महिला असून,याप्रकरणी ती खोटे आरोप करण्याची शक्यता आहे. त्यानुसार हसीनाने फक्त दाऊदची बहीण असल्याने, पोलीस त्रास देत असल्याचा आरोप केला होता. दाऊदच्या कारभाराची धुरा हसीनावर जरी असली, तरी तिला साथ देत होता तो इक्बाल कासकर. दाऊदचा परिवार तसेच भाऊ नुरा आणि अनिस 1993 मध्ये कराचीत आल्यानंतर इक्बालने काही काळ दुबईतच वास्तव्य केले.
त्यानंतर इक्बालने दाऊद आणि त्याचे देशातील राजकीय, पोलीस दलातील संपर्क वापरून देशात आले तर किती आणि काय शिक्षा होईल ? याची पडताळणी केल्यानंतर 2003 मध्ये इक्बालने मुंबई गाठली. यावेळी बनावट पासपोर्टप्रकरणी त्याला अटक केली. त्यानंतर सारा-सहाराच्या जागेवर अवैधरित्या मालकी दाखविल्याने त्याला अटक केली. मात्र सध्या इक्बालवर एकही गुन्हा नसल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यामुळे डी कंपनीची धुरा आपसूकच त्याच्याकडे जाणार हे निश्चित असल्याने, यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेऊन आहेत. डी कंपनीचे असलेले फोन कॉल्स, सोशल नेटवर्किंग साईटवर डी कंपनीचे असलेले थोडेफार वास्तव्य यावर गुप्तचर यंत्रणांनी करडी नजर ठेवली आहे.

