मुंबईत आगीचे तांडव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत आगीचे तांडव

Share This
अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू; 25 जखमी
मुंबई - अंधेरी येथील "लोटस बिझनेस पार्क‘ या 22 मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीत नितीन इवलेकर या अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. 25 जवान गंभीर जखमी झाले. 21 व्या मजल्यावरील आग जवानांनी प्राण पणाला लावून आटोक्‍यात आणली; पण अचानक खालच्या मजल्यावरून आगीचा भडका उडाला. त्यात पाण्याचा फवारा मारणारा पाइपही वितळून गेला. त्यामुळे जवान आगीत अडकले. त्यांच्या सुटकेसाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या दोन हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे आगीचे लोळ वाढले. त्यामुळे मदतकार्यात अडथळे आले.
सकाळी पावणेदहा वाजता आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. मात्र, आग वेगाने पसरू लागल्यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास हा "ब्रिगेड कॉल‘ जाहीर करून अन्य अग्निशामक केंद्रांना, तसेच भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आरसीएफ व राज्याच्या अग्निशमन यंत्रणेची मदत मागवण्यात आली.

ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी मुंबई अग्निशामक दलाचे 33 जवान इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेले होते. मात्र, अचानक 20 व्या मजल्यावरून आगीचा भडका उडाला. त्यामुळे हे सर्व जवान अडकले. त्यातील इवलेकर यांच्यासह काही जवान मोठ्या धैर्याने वरच्या मजल्यावर गेले. मात्र, थोड्या वेळात तेथेही आग पसरू लागल्यामुळे अग्निप्रतिबंधक गणवेश असतानाही आगीच्या ज्वाळांनी घेरल्याने इवलेकर यांचा मृत्यू झाला.

जवानांची सुटका करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरना बोलावण्यात आले. नौदलाच्या हेलिकॉप्टरने गच्चीवरील एका जवानाला उचलले तेव्हा खाली उभ्या असलेल्या शेकडो नागरिकांनी श्‍वास रोखून धरला. गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना नवी मुंबईतील एरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 20 जवानांना विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फवारा मारणारा पाइप वितळला आग आटोक्‍यात आणण्यासाठी 21 व्या मजल्यावर गेलेल्या जवानांकडे असलेला पाण्याचा फवारा मारणारा पाइपही आगीच्या ज्वाळांत वितळून गेला.
सुरवातीला 22व्या मजल्यावर एका कोपऱ्यात आग लागली होती. मात्र, वाऱ्यामुळे ही आग संपूर्ण मजल्यावर पसरली. त्यानंतर 21व्या मजल्यावर भडका उडाला. फुटलेल्या काचांमुळे आग इतर मजल्यांवरही पसरत गेली.

इमारतीच्या मालकावर कारवाई इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यक्षम नव्हती. स्प्रिंकलर, वेटलायझर, पाण्याच्या टाक्‍या तसेच अग्निशमन यंत्रणेचा काहीही उपयोग झाला नाही. देखभाल नसल्याने यंत्रणा मृतवत होती. यंत्रणेबाबत निष्काळजीपणा केल्याचा ठपका महापालिका आयुक्तांनी इमारतीच्या मालकावर ठेवला आहे. अग्निशमन कायदा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि फौजदारी कायद्यानुसार मालकावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली.

इवलेकरांच्या कुटुंबाला मदत आगीत मृत्यू झालेल्या इवलेकर या जवानाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून 15 लाखांची मदत महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी जाहीर केली आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages