निष्काळजीपणा पडला महागात; रुग्णालयाला १.७५ लाखांचा दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2014

निष्काळजीपणा पडला महागात; रुग्णालयाला १.७५ लाखांचा दंड

९१ वर्षीय वृद्धेच्या मृत्यूला रुग्णालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत ग्राहक न्यायालयाने वडाळ्यातील आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाला १.७५ लाखांचा दंड ठोठावला. पेशींची संख्या कमी असतानाही वृद्ध महिलेला नेत्र शस्त्रक्रियेसाठी 'फिट' ठरवण्याचा निष्काळजीपणा रुग्णालयाच्या अंगलट आला. ग्राहक न्यायालयाच्या या निकालाने मागील आठ वर्षे सुरू ठेवलेल्या लढय़ाला यश आल्याची प्रतिक्रिया वृद्धेच्या नातवाने दिली आहे. ४८ वर्षीय संपत कुमार यांनी ५ जुलै २00६ रोजी आपली आजी लक्ष्मी सुंदरम यांना नेत्र तपासणीसाठी आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयात नेले होते. लक्ष्मी यांना उजव्या डोळ्याने कमी दिसत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टरांनी रक्ताचे नमुने तपासून लक्ष्मी या शस्त्रक्रियेसाठी 'फिट' असल्याचे सांगितले होते; पण शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून रक्तस्राव सुरूच राहिला होता. 

त्यामुळे संपत कुमार यांनी दुसर्‍या डॉक्टरांचे मत घेतले. त्या डॉक्टरांनी लक्ष्मी यांच्या शरीरातील पेशींची संख्या सरासरीपेक्षा खूपच कमी व शस्त्रक्रियेसाठी पुरेशी नसल्याचे निदान केले. नेत्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे लक्ष्मी यांचा १८ डिसेंबर २00६ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञांनी नेत्र रुग्णालयाच्या अहवालाचा आढावा घेऊन शस्त्रक्रियेतील हलगर्जीपणावर शिक्कामोर्तब केले होते. 

सर्व बाबी विचारात घेऊन ग्राहक न्यायालयाने अर्जदार संपत कुमार यांना १.७५ लाख रुपये देण्याचा आदेश रुग्णालयाला दिला. दरम्यान, जिल्हा ग्राहक न्यायालयाने डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावल्याचा दावा आदित्य ज्योत रुग्णालयाच्या प्रवक्त्या डॉ. राधिका श्रीनिवासन यांनी केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS