हुतात्मा चौकात कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2014

हुतात्मा चौकात कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार

मुंबई - कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभास निर्माण केला आहे. भाजप आणि मोदी यांच्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी कॉंग्रेस सज्ज झाली असून, 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या हुतात्मा चौकातून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि प्रचार समिती प्रमुख नारायण राणे यांनी आज केली. कॉंग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे कॉंग्रेसच्या प्रचार समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत कॉंग्रेसच्या प्रचाराची घोषणा केली. 


कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने देशभरात अनेक प्रकल्प उभे केले. मात्र, या प्रकल्पांची उद्‌घाटने मोदी करत आहेत, अशी टीका करत, मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून देशातल्या जनतेला फसवल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. आजच्या बैठकीत कॉंग्रेसच्या प्रचाराची रणनीती आखण्यात आली. महाराष्ट्राच्या लढ्याचे प्रतीक आणि अस्मिता असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या साक्षीने कॉंग्रेसने प्रचाराची सुरवात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वतंत्र विदर्भाला कॉंग्रेसचा विरोध नसल्याची भूमिकाही राणे यांनी या वेळी स्पष्ट केली. स्वतंत्र विदर्भाला फक्‍त शिवसेनेचा विरोध आहे. इतर सर्व पक्षांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी या वेळी निदर्शनास आणले. कॉंग्रेसने स्वतंत्रपणे प्रचाराची सुरवात करण्याचा निर्णय घेतल्याबाबत विचारले असता, आघाडी ही जागांची तडजोड असल्याचे ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर सभेत टोले लगावल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. आज नारायण राणे यांनीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत सुनावले. पंतप्रधान हे भारताचे असतात; ते केवळ भारतीय जनता पक्षाचे नसतात, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. संपूर्ण प्रचारात कॉंग्रेसने केलेल्या कामाचा प्रभावी प्रसार करून, मोदी यांनी निर्माण केलेला विकासाचा आभास हाणून पाडला जाईल, असा इशारा राणे यांनी या वेळी दिला. 

Post Bottom Ad

JPN NEWS