गृहनिर्माणमंत्र्यांना पालिका मुख्यालयात धक्काबुक्की - मंत्री हात हलवत परतले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2015

गृहनिर्माणमंत्र्यांना पालिका मुख्यालयात धक्काबुक्की - मंत्री हात हलवत परतले

मुंबई : परळ येथील बोगदा चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या आणि कुलाब्यातील पाण्याच्या समस्येसंबंधी चर्चा करण्यासाठी पालिका मुख्यालयात आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केली. 'महेता यांनी रक्षकांना आपण मंत्री आहोत,' असे सांगूनही त्यांनी ऐकले नाही. उलट त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रवेशद्वाराजवळ बराच वेळ गोंधळ घातला.

भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी कुलाब्यातील पाणी प्रश्नासंबंधी आझाद मैदानात मोर्चा काढला होता. या वेळी महेता उपस्थित राहिले होते. मोर्चाला येण्याआधी महेता यांनी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी संपर्क साधून भेटण्याची वेळ मागितली पण त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्याशी चर्चा करून सायंकाळी पावणेपाचची वेळ घेतली होती. त्यामुळे पुरोहित व महेता आणि काही कार्यकर्ते ४.३0 वाजता पालिका मुख्यालयाच्या सहा क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले असता, सुरक्षारक्षकांनी महेता आणि पुरोहित यांना ओळखपत्र विचारले. त्यावर 'आपण मंत्री असून, दराडे यांच्याशी पूर्वनियोजित भेट ठरली होती,' असे सांगितले तरीही सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला आणि धक्काबुक्की केली. यावरून भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.

ही घटना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना समजल्यानंतर त्यांनी पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर सुरू असलेली आपत्कालीन व्यवस्थापन बैठक सोडून, प्रवेशद्वाराजवळ येऊन महेता यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली व यावर पडदा पाडला. असा मोर्चा येणार आहे, याची माहिती आम्हाला वरिष्ठांकडून मिळाली नव्हती. येथे येणार्‍या प्रत्येकाला पास व ओळखपत्र विचारणे आमचे काम आहे, ते आम्ही केले, असे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे.

आयुक्तांना भेटायला आलेले मेहता यांना आयुक्त दिल्लीला असल्याने त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे दराडे यांना ४.४५ वाजता भेटण्याचे ठरले, मात्र दराडे या तीन वाजताच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी मंत्रालयात गेल्या. जाताना त्यांनी मेहता यांना कोणतीच सूचना दिली नाही. त्यामुळे आधीच संतापलेले मेहता आले तसे हात हलवत गेले.

Post Bottom Ad

JPN NEWS