मुंबईतील ८00 बोगस डॉक्टरांवर पोलिसांची करडी नजर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2015

मुंबईतील ८00 बोगस डॉक्टरांवर पोलिसांची करडी नजर

मुंबई : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी न करताच शहरात डॉक्टरकीचे दुकान थाटणार्‍या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. या बोगस डॉक्टरांवर आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. शहरातील चार बोगस डॉक्टरांना अटक केल्यानंतर लवकरच जवळपास ८00 डॉक्टरांना ताब्यात घेण्याचा निर्धार आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या बरोबरीने ही कारवाई केली जात असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी शहरातील बोगस डॉक्टरांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहपोलीस आयुक्त डी. डी. कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत आहे. विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने विविध पथके स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. बोगस डॉक्टरला अटक करेपर्यंत संबंधित कारवाईची माहिती गुप्त ठेवली जात आहे. पोलिसांनी बुधवारी कुरार येथील तीन, तर दिंडोशी परिसरातील एका बोगस डॉक्टरला अटक केली. मागील काही वर्षे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडे कम्पाऊंडरचे काम करणारे सध्या बेकायदेशीररीत्या डॉक्टर म्हणून वावरू लागले आहेत. या बोगस डॉक्टरांना केवळ औषधे देण्याचा अनुभव आहे. कम्पाऊंडर म्हणून केलेल्या कामाच्या आधारे या बोगस डॉक्टरांचा डिग्रीशिवाय धंदा सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. छापा टाकणार्‍या पोलिसांच्या पथकासमवेत एक डॉक्टरही ठेवला जात आहे. जेणेकरून छापा टाकलेल्या डॉक्टरच्या प्रमाणपत्राची तेथेच सत्यता पडताळली जाईल. आर्थिक गुन्हे शाखेने २00२-२00३ या कालावधीत बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मोहीम सुरू केली होती. त्या वेळी ४२0 हून अधिक बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक व तपासाधिकारी राजन काटदरे यांनी सर्व ४२0 डॉक्टरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी गेल्यावर्षी जवळपास ८ डॉक्टरांना अटक केली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS