निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा विमा उतरवण्याचा प्रस्ताव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2015

निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा विमा उतरवण्याचा प्रस्ताव


मुंबई- मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांची दरवर्षी प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना सर्व विभागप्रमुखांना प्रशासनाने दिल्या असून महापालिकेच्या वतीने त्यांचा विमा उतरवण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे वैद्यकीय शिक्षण व  रुग्णालयांच्या प्रमुख संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले.

महानगर पालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची नेमणुकीनंतर निष्णात डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येते. तसेच दर तीन महिन्यांनी त्यांची नियमित तपासणी करण्याची योजनाही सुरू केलेली आहे. त्यांना पोषण आहार योजनेंतर्गत पौष्टिक नाश्ताही रोज देण्यात येतो. याबरोबरच त्यांना वेळोवेळी संसर्गजन्य रोगांबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. ज्या रुग्णालयातील डॉक्टरांना व कर्मचा-यांना टी.बी. किंवा इतर संसर्गजन्य रोगाची लागण होते आणि महापालिका रुग्णालयात उपचार घेत असतील तर त्याचा सर्व खर्च महापालिका निधीतून करण्यात येतो. २०१२ पासून यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य रोगाचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना चालू असल्याचे डॉ. सुहासिनी नागदा यांनी स्पष्ट केले.
महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना शिक्षणाचा भाग म्हणून आणि आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध व्हावी म्हणून सेवा निवासस्थान दिले जात असले तरी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांना दहा तासांपेक्षा अधिक तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. निवासी डॉक्टरांवरील कामाचा अति ताण आणि आरोग्याची होणारी हेळसांड यामुळे आतापर्यंत एका वर्षात ३ ते ४ निवासी डॉक्टरांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे कामाचे आठ तास करण्यात यावे आणि त्यांच्या आरोग्याची वार्षिक तपासणी करण्यासंबंधात धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक रामआशिष गुप्ता यांनी केली होती. त्याअनुषंगाने प्रशासनाच्या वतीने नागदा यांनी ही माहिती दिली असून या डॉक्टरांच्या आरोग्याची वार्षिक तपासणी करण्यासंदर्भात प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना सर्व विभागांच्या प्रमुखांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS