सत्ताधारी शिवसेना नगरसेवकाचा जकात चुकवून मुंबईत आणलेला ट्रक पकडला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2015

सत्ताधारी शिवसेना नगरसेवकाचा जकात चुकवून मुंबईत आणलेला ट्रक पकडला

मुंबई / प्रतिनिधी (25 - 6 - 2015)
मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि सध्या स्थायी समिती सदस्य असलेले रमाकांत रहाटे यांच्या मुलाच्या नावे असलेल्या ऑक्टराय क्लिअरिंग कंपनीकडून कमी जकात भरून मुंबईमध्ये आणलेला ट्रक गुरुवारी सकाळी कॉटनग्रीन येथील राम मंदिराजवळ पकडण्यात आला आहे. या ट्रक मध्ये १० ते १२ लाखांच्या टाइल्स आणि फोम असलेला माल असून सदर ट्रक पालिकेच्या जकात विभागाने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला असल्याचे समजते. सत्ताधारी शिवसेना नगरसेवकाचा व माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि सध्या सदस्य असलेल्या नगरसेवकाचा कमी जकात भरून आणलेला ट्रक पकडल्याने सत्ताधारी नगरसेवकाबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.
जीजे १३ डब्लू ४३२५ या क्रमांकाचा टाइल्स आणि फोम असलेला ट्रक दहिसर चेकनाका येथून कमी जकात भरून मुंबईमध्ये आणण्यात आला होता. सदर ट्रक कमी जकात भरून आणला असल्याची खबर शिवडी विभागाचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष गोरख कांगणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी कॉटनग्रीन येथे राम मंदिराजवळ ट्रक पकडला. ट्रक पकडल्याची बातमी रमाकांत रहाटे यांना मिळताच रहाटे यांनी कांगणे यांना फोन वरून धमकी दिली. रहाटे यांनी धमकी दिल्याची काळाचौकी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून ट्रक ताब्यात घेतला असून सध्या हा ट्रक पालिकेच्या जकात दक्षता विभागातील कदम आणि चकोर या दोन अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी बकरी अड्डा येथील सिमेंट गोडाऊनमध्ये ताब्यात घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्थायी समिती सदस्य रमाकांत रहाटे यांचा कमी जकात भरून मुंबईमध्ये आणलेल्या ट्रकबाबत पुढे काय कारवाई झाली याची माहिती मिळवण्यासाठी दक्षता विभागाचे एम. आर. गुरव यांच्याशी संपर्क साधला असता ते मिटिंग मध्ये असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS