नालेसफाईची पालिकास्तरावर चौकशी करा अन्यथा राज्य सरकारकडे दाद मागू - सत्ताधारी भाजपचा शिवसेनेला इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2015

नालेसफाईची पालिकास्तरावर चौकशी करा अन्यथा राज्य सरकारकडे दाद मागू - सत्ताधारी भाजपचा शिवसेनेला इशारा


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईतील नालेसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी गाळ काढल्याची सांगितलेली आकडेवारी आणि नालेसफाईचा गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांना वजनकाट्याच्या पावत्या सादर करत्या आल्या नसल्याने नालेसफाईबाबत भाजपाने शंका उपस्थित केली होती. नालेसफाईची केलेली कामे समाधान कारक नाहीत असे भाजपाने त्याचवेळी स्पष्ट केले होते. त्यानंतरची पूरपरिस्थिती पाहता नालेसफाईच्या कामांची महानगर पालिका स्तरावर चौकशी व्हावी अशी आमची भूमिका आहे. जर महापालिका स्तरावर याबाबत चौकशी होणार नसेल तर मात्र भाजप मुख्यमंत्र्यांना भेटून सरकारकडे याबाबत दाद मागेल असा इशारा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिला आहे. शेलार यांच्या इशाऱ्यामुळे मुंबई महानगर पालिकेत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने शिवसेनेला घरचा आहेर देवून नालेसफाईबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. 

मुंबईतील मान्सून तयारी आणि महापालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांबाबत भाजपा नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज महापालिका मुख्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक घेतली याचवेळी त्यांनी सुधारसमीती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या नव्या दालनाचे उद्धाटनही केले. उद्धाटनाच्या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह भाजपा नगरसेवक उपस्थित होते. महापालिका मुंबईकरांना देत असलेली आरोग्यसेवा, त्यातल्या त्रुटी, त्यातले दोष आणि भविष्यात करावयाच्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा घेऊन भाजपातर्फे आरोग्य यंत्रणेची श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे.  तर बृहन्मुंबईमहानगरपालिका आकारत असेलली मातमत्ता कर आणि इतर कर यांची वैधता आणि त्यातील त्रुटी याबबतही एक स्वतंत्र श्वेतपत्रिका काढण्यात येणार असून दोन्ही कामांसाठी  भाजपा नगरसेवकांच्या दोन स्वतंत्र समीत्या गठीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
 
महापालिकेची आरोग्य यंत्रणा जे काम करत आहे त्याबाबत भाजपा नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे यंत्रणेवर समाधान व्यक्त करावे अशी परिस्थिती नाही. म्हणून येत्या एक महिन्यात आरोग्य यंत्रणेची श्वेतपत्रिकाच काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. ही श्वेतपत्रिका काढण्यासाठी महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती अध्यक्षा सुनिता यादव, नगरसेवक राम बारोट, विनोद शेलार, राजश्री शिरवडकर, अश्विन व्यास यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने ही श्वेतपत्रिका तयार केल्यानंतर मागण्या वजा निवेदन तयार करून ते पालिका आयुक्तांना भाजपातर्फे देण्यात येईल आणि त्यामधील जास्तीत जास्त मागण्या मुंबईकरांच्या हितासाठी पूर्ण करण्यासाठी भाजप पाठपुरावा करेल. या श्वेतपत्रिकेमध्ये सध्याची डॉक्टरांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा, रूग्णालयातील सुविधा, जेनरिक औषधांचा पुरवठा यासह ज्या जागांवर आरक्षणे होती अशा जागा ताब्यात घेऊन महापालिकेने आरोग्य केंद्र उभारली आहेत की नाहीत किंवा ज्या जागांवर आरोग्यकेंद्रे उभारली ती हस्तांतरीत झाली की नाही या सगळ्याचा आढावा घेण्यात येणार आहे असे शेलार यांनी सांगितले. 
 
मुंबईकरांवर यापुर्वीही ज्या सुत्रांनुसार मालमत्ता कर आकारण्यात आला ते वैध नव्हते त्यामुळे मुंबईकरांच्या खीशातून सुमारे एक हजार कोटी पेक्षा जास्तीचा  कर महापालिकेने वसून केला आहे ही रक्कम मुंबईकरांना परत करावी अशी भाजपाची स्पष्ट भूमिका आहे. तत्कालिन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे याबाबत भाजपाने पाठपुरावा केला होता याबाबत न्यायालयानेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र तत्कालीन पालिकाआयुक्तांनी अॅडव्होकेट जनरलचे मत जाणून घेण्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा बाजूला सारला आहे. भाजप या विषयाचा आजही पाठपुरावा करीत असून हे पैसे मुंबईकरांकडून अवैधरित्या गोळा करण्यात आले असून ते त्यांना परत मिळालेच पाहिजेत अशी भाजपाची भूमिका आहे.  तसेच सुमारे ४९% मुंबईकरांना मलनिस्सारन वाहिन्यांची सुविधा महापालिकेने आजही उपलब्ध करून दिलेली नाही. तरीही त्यांच्याकडून मलनिस्सारन कर घेण्यात येतो. तसेच एकूणच मुंबईकरांच्या कडून घेण्यात येणारा कर आणि त्याची वैधता यात सुसुत्रता नाही याबाबतही भाजपा अभ्यास करून एक श्वेतपत्रिका काढणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS