'फॅशन स्ट्रीट' बेमुदत बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2015

'फॅशन स्ट्रीट' बेमुदत बंद

मुंबई : बॉम्बे जिमखाना आणि मेट्रो सिनेमाजवळील 'फॅशन स्ट्रीट'वरील ३00 हून अधिक कपडे विक्रेत्यांनी कपडे विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या स्टॉल्स विक्रेत्यांनी आपापल्या दुकानांमध्ये पाणी गळू नये यासाठी 'प्लास्टिकच्या शीट' व ताडपत्र्या टाकल्या आहेत. त्याला पालिकेने विरोध केल्यामुळे सर्वच विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

प्लास्टिकच्या शीट टाकल्यास त्यात डासाच्या अळ्यांची उत्पत्ती होते आणि ते टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. येथील कपडे व आभूषणे खरेदी करण्यासाठी मुंबईसह लगतच्या शहरांतून आणि अन्यत्र राहणार्‍या पर्यटकांची नेहमी गर्दी असते. देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा जणू 'पिकनीक स्पॉट' झाला आहे. हजारो कपड्यांचा 'स्टॉक' येथे असल्याने विक्रेते पावसाळ्यात आपापल्या दुकानांवर प्लास्टिकच्या शीट टाकून कपडे भिजू देत नाहीत. मात्र या वेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी त्याला कडाडून विरोध करून, त्याविरोधात मोहीम उघडली. यामुळे येथील 'फॅशन स्ट्रीट शॉपकिपर्स असोसिएशन'ने पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांशी याबद्दल चर्चा केली, पण अधिकार्‍यांनी 'ही कारवाई दराडे यांच्या आदेशानुसार होत आहे, असे स्पष्ट सांगून हात वर केले.

Post Bottom Ad

JPN NEWS