रेशनिंगचे काळ्याबाजारात जाणारे चार ट्रक जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेशनिंगचे काळ्याबाजारात जाणारे चार ट्रक जप्त

Share This

धान्य पुरवठा करणाऱ्या तीन संस्थांवर होणार कारवाई 
मुंबई \ रशिद इनामदार 
सरकारने अधिकृत शिधावाटप यंत्रणेद्वारे   देशातल्या गरीब जनतेला दोन वेळ चा घास सुखात खाता यावा अशी व्यवस्था केलेली आहे. मात्र या गरिबांना स्वस्तात दिल्या जाणाऱ्या अन्न धान्यावर देखील नफेखोर रेशनिंग माफियाची वक्रदृष्टी आहे. स्वतःच्या तिजोरीत अमाप माया जमा व्हावी यासाठी हे नफेखोर रेशनिंग माफिया माणुसकीला काळिमा फासत गरिबांच्या तसेच अंगणवाडीतील चिमुरड्याच्या तोंडचा घासदेखील हिरावून घेत आहेत.अशा गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून सरकार दिवसेंदिवस गंभीर होत आहे . दोषींविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे . कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता रेशनिंग माफिया आपले काम राजरोसपणे करत आहेत . असाच गैरप्रकार करणाऱ्यांना शिधावाटप विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानखुर्द परिसरात रंगेहात पकडले आहे . 
मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या पार्किंग मध्ये रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारे ४ माल ट्रक उभे होते. तो धान्यसाठा ज्या रेशनिंग दुकानावर पोहोचायला हवा त्या ठिकाणी न जात अन्यत्र जाणार असल्याची माहिती मुंबई प्लस या हिंदी साप्ताहिकाचे मालक फारूक मेवाती यांना मिळाली . ही गंभीर बाब त्यांनी रेशनिंग खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली . अधिकाऱ्यांनी धाड टाकून गाड्यांची तपासणी केली. ट्रक तपासून चालक व मालकाची चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देत आली नाहीत.  त्यांनी चार ही ट्रक व संबंधित आरोपींना मानखुर्द पोलिसांच्या ताब्यात दिले . 

ज्ञानेश्वर खिल्लारे उप नियंत्रक शिधावाटप (अंमल ) प्रधान कार्यालय यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाउन या कारवाईचा सविस्तर आढावा घेतला. तसेच मधुकर बोडके उपनियंत्रक ई परिमंडळ , मधुकर गिरी ,दिनेश उदेभान सोईतकर,प्रवीण रामदास म्हात्रे , नरेंद्र सोनावणे या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची घटनास्थळी जाउन माहिती घेतली. या प्रकरणामध्ये मसालावाला ग्रेन मर्चंट असोशिएशन ,बृहन्मुंबई ग्रेन डीलर्स असोशिएशन ,अन्नपूर्णा सहकारी ग्राहक संस्था या धान्य वितरण करणाऱ्या संस्थांची चौकशी होण्याची शक्यता आहे . संबंधित संस्थाच्या पदाधिकाऱ्यांची देखील चौकशी या प्रकरणी होणार आहे . अन्न व नागरी पुरवठा विभागाचे नियम धाब्यावर बसवून मुंबईतील विविध भागातील अधिकृत शिधावाटप दुकानांवर वितरीत करण्यासाठीचे धान्य या संस्थांनी वितरीत न करता पळवण्याचा प्रयत्न केल्याचे यात आढळून आले आहे .  

मानखुर्द पोलिसांनी जप्त केलेला एकूण मुद्देमाल एकोणचाळीस लाख शहाऐंशी हजार आठशे त्र्याहत्तर रुपये किमतीचा आहे . जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच गुन्ह्याशी संबंधित इतर कायद्यांनुसार दोषींविरुद्ध गुन्हानोंद  करण्यात आली आहे. शिधावाटप अधिकारी रामकृष्ण नेमाजी कांबळे यांनी रीतसर लेखी तक्रार मानखुर्द पोलिस ठाण्यात दाखल केली आहे . मानखुर्द पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाची चौकशी  करत आहेत . 
----------------------------------
कुर्ला परिसरातील दुकानातून जे धान्य उतरवून घ्यायचं होतं कोणतीही माहिती न देता मानखुर्द ला त्यांनी ट्रक आणले होते . त्यांनी नियम मोडून हद्दीच्या बाहेर सरकारी धान्य साठा आणला होता. आम्ही पोलिसांच्या ताब्यात मुद्देमाल व आरोपी दिलेले आहेत. रीतसर तक्रार हि दिलेली आहे ते चौकशी करतील 
ज्ञानेश्वर खिल्लारे, उप नियंत्रक शिधावाटप (अंमल ) प्रधान कार्यालय
जप्त केलेले धान्य आणि ९ आरोपी आम्ही मानखुर्द पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याची चौकशी होऊन पुढे दोषी कोण ते ठरेल . मुख्य नियंत्रकांसमोर सुनावणी होईल त्यानंतर आम्ही तो धान्यसाठा पुन्हा ताब्यात घेउ 
रामकृष्ण नेमाजी कांबळे, शिधावाटप अधिकारी

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages