महिलेला अश्लील छायाचित्रे पाठवून छळणार्‍याला शिक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

महिलेला अश्लील छायाचित्रे पाठवून छळणार्‍याला शिक्षा

मुंबई : बनावट ई-मेल आयडी तयार करून महिलेला अश्लील छायाचित्र व सामग्री पाठवून छळ करणार्‍या इसमाला न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारावर दोषी ठरविले आहे. २00९ च्या या गुन्ह्याप्रकरणी आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली असून अशा प्रकरणात शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

२00९ साली खाजगी कंपनीत नोकरी करणारी फिर्यादी महिला सोशल नेटवर्किंग वेबसाईट ऑर्कुटच्या माध्यमातून आरोपी योगेश प्रभू याच्या संपर्कात आली. आकरुटच्या माध्यमातून त्यांच्यात अनेकदा संभाषण झाले. परंतु आरोपीचा स्वभाव फिर्यादी महिलेस न आवडल्याने तिने प्रभू याच्याशी संपर्क ठेवणे बंद केले व आकरुटच्या फ्रेंड लिस्टमधून त्याला काढून टाकले. त्यानंतर प्रभूने याचा राग मनात धरून फिर्यादी महिलेला बनावट ई-मेलच्या माध्यमातून अश्लील छायाचित्र व मजकूर पाठवून सतवणूक करण्यास सुरुवात केली. फिर्यादी महिलेला अशाप्रकारे ई-मेल कोण पाठवत आहे याची माहिती नव्हती. त्यामुळे तिने याकडे दुर्लक्ष केले, परंतु अशा प्रकारचे ई-मेल वारंवार येऊ लागल्यानंतर फिर्यादी महिलेने या प्रकरणी सहपोलीस आयुक्त (गुन्हे) राकेश मारिया, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज केला. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाने या प्रकरणामध्ये तांत्रिक तपास सुरू केला. त्यामधून संशयित बनावट ई-मेल आयडीबाबतचे आयपी अँड्रेसेस प्राप्त झाले. ते आरोपी योगेश प्रभू नोकरी करीत असलेल्या कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले. तेथे अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील फिर्यादीला अश्लील मजकूर पाठविणारा हा आकरुटवरील ओळखीचा असलेला योगेश प्रभू हाच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या गुन्ह्यात प्रभूने वापरलेली संगणक सामग्री पोलिसांनी जप्त केली होती. सप्टेंबर २00९ साली तपासाअंती या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. खटल्याची सुनावणी ३ जुलै २0१५ रोजी पूर्ण झाली. प्रभू या आरोपीने गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यावरून न्यायालयाने योगेश प्रभू या आरोपीला दोषी ठरवून भारतीय दंडविधान संहितेअंतर्गत ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तो न दिल्यास एक महिना साधी कैद, तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत ३ महिने साधी कैद व १0 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अजून दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

Post Bottom Ad

JPN NEWS