गट क व ड कर्मचा-यांच्या विमा संरक्षणात वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

गट क व ड कर्मचा-यांच्या विमा संरक्षणात वाढ


मुंबई / 29 Sep 2015 / प्रतिनिधी
राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याला मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मदत व्हावी आणि सेवानिवृत्तीनंतर त्यास मिळावयाच्या उत्पन्नात वाढ म्हणून त्याला काही ठोक रक्कम देता यावी अशा दुहेरी लाभांसाठी सुरु असलेल्या राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजनेत सुधारणा करण्यात आली असून या सुधारणेनुसार गट क च्या  कर्मचा-यांना 1 लाख 20 हजाराऐवजी  रु. 3 लाख 60 हजाराचे विमासंरक्षण व गट ड च्या कर्मचा-यांना रु. 60 हजाराऐवजी 2 लाख 40 हजाराचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. 
   
वाढलेले आयुर्मान लक्षात घेता बचतीची आवश्यकता आहे. आजच्या परिस्थितीत अपुरे वाटणारे विमा संरक्षण यास्तव गट क व  ड च्या कर्मचारी संघटनांनी गट विमा योजनेअंतर्गत मासिक वर्गणी व त्या अनुषंगाने विमासंरक्षणात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गट क यांची विमा वर्गणी दरमहा रु. 360 व गट ड ची विमा वर्गणी 240 इतकी होईल.राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजनेचा वर्धापन दिन   दि. 01 जानेवारी हा असल्यामुळे सुधारीत योजना दि. 01 जानेवारी, 2015 पासून लागू होईल. सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम 01 नोव्हेंबर ते 31 मार्च, 2016 मधील वेतनातून समान हप्त्यात वसुल केली जाईल.

“ना नफा ना तोटा” तत्वावर शासनातर्फे सुरू असलेली गट विमा योजना बाजारात उपलब्ध असलेल्या योजनांपेक्षा अधिक लाभदायी व सुटसुटीत आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या सदर निर्णयाच्या अनुषंगाने या सुधारीत योजनेचा लाभ सुमारे 4 लाख 70 हजार कर्मचा-यांना होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS