बीकेसीमध्ये बेस्ट बससाठी राखीव मार्गिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बीकेसीमध्ये बेस्ट बससाठी राखीव मार्गिका

Share This
मुंबई : 2 Oct 2015 वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी जोडरस्त्यावर बेस्ट बससाठी ३.५ मीटर इतकी रुंद मार्गिका राखीव ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाने सरकार आणि निम्न सरकार मान्य कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलात कार्यालयांची वाढती संख्या आणि त्यानुसार दैनंदिन कामासाठी वांद्रे तसेच कुर्ला स्थानकावरून ये-जा करणारे प्रवासी यांचा कार्यालयीन वेळेत गजबजाट असतो. या मार्गादरम्यान बेस्टच्या डबलडेकर बसमुळे वळणांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळेच प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार्‍या या प्रकल्पामध्ये बेस्ट बससाठीची राखीव मार्गिका एमटीएनएल जंक्शनपासून कलानगर जंक्शनपर्यंत आणि त्यापुढे पश्‍चिम द्रुतगती महामार्गाजवळील ओएनजीसी इमारतीपर्यंत असणार आहे. ही राखीव मार्गिका ठरावीक रंगांनी आखण्यात येणार असून त्यावर माहिती फलक असतील आणि मार्गिका स्प्रिंग बोलार्ड्सद्वारे आरक्षित करण्यात येणार आहे. सुरुवातीला केवळ बेस्ट बससाठी राखीव असणारी ही मार्गिका भविष्यामध्ये इतर खाजगी प्रवासी बससाठी खुली करण्याचा विचार एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे. एमटीएनएल जंक्शनपासून ते कलानगर जंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. राखीव मार्गिकेमुळे हे अंतर जलद गतीने व सुरक्षितपणे कापणे शक्य होणार आहे. खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला या प्रकल्पामुळे प्राधान्य मिळत असल्याचे पाहून वांद्रे-कुर्ला संकुलास नियमितपणे भेट देणार्‍यांना आनंद होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages