दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणांत लक्ष घालणार - प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2015

दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणांत लक्ष घालणार - प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक

मुंबई : 30 Sep 2015 
दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या तपासाबाबत नेमके काय सुरू आहे, याची माहिती घेऊन या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केले. प्रवीण दीक्षित यांनी पोलीस महासंचालक या पदाची सूत्रे बुधवारी हाती घेतली. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना दीक्षित यांनी दहशतवादाला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस मित्रांची मदत घेणार असल्याचे संकेत दिले. 

राज्याच्या पोलीस प्रमुखपदी विराजमान होताच प्रवीण दीक्षित यांना राज्यातील दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्या प्रकरणांना तोंड द्यावे लागणार, हे गृहित धरून त्यांनी पोलीस मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की, दाभोळकर-पानसरे हत्याकांडाचा तपास नक्की कुठपर्यंत आला आहे, याची माहिती आपण घेणार आहोत. पानसरे हत्याकांडाच्या तपासकामी पोलिसांच्या हाती यश येत असून त्याकडे आपले लक्ष असणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. दाभोळकर हत्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने काय काम केले, हे पाहिले जाईल. त्याचबरोबर राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. दहशतवादाचा धोका पाहता राज्यातील सर्व पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील दहशतवादाबरोबरच गुन्हेगारीवर देखील आळा बसणार असल्याचा आशावाद दीक्षित यांनी व्यक्त केला. ज्या प्रकारे आपण राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी सांभाळत असताना संपूर्णपणे आधुनिकीकरणावर भर दिला होता त्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातही आता आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे संकेत दीक्षित यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिले. त्याचबरोबर सायबर सेल व पोलिसांचे मनोबल वाढवण्यावर भर दिला जाईल, असे सांगून दयाळ यांच्या कारकीर्दीत दोषसिद्धीचे प्रमाण वाढले होते, ते आणखी कसे वाढवले जाईल, यावर आपण भर देणार असल्याचे या वेळी दीक्षित यांनी सांगितले. पोलीस दलातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी जोमाने प्रयत्न केला जाईल. राज्यातील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहितीही दीक्षित यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS