मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील उदंचन केंद्रातील यंत्रात बिघाड झाला आहे. या केंद्रातील २० उदंचन पंपांपैकी १३ पंप बंद पडले होते. यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित झाला होता. पालिकेने सायंकाळपर्यंत १७ पंप सुरू केले असून इतर पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Water cut in Mumbai) (Mumbai News)
मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात आज (दिनांक १९ जून २०२४) दुपारी २.५० वाजता बिघाड झाला. त्यामुळे २० उदंचन पंपांपैकी १३ पंप बंद पडले. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दुरुस्तीचे काम होईपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठासुद्धा कमी दाबाने होणार आहे. तसेच उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पिसे येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल उदंचन केंद्र आहे. आज दुपारी येथील संयंत्रात तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, २० पैकी १३ पंप बंद झाले. दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेऊन टप्प्याटप्प्याने पंप सुरू करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत पिसे केंद्रातील २० पैकी १७ पंप कार्यरत करण्यात यश आले आहे. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. उर्वरित ३ पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित पंप लवकरच कार्यान्वित करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. त्यामुळे, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment