सोशल मीडियावर बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, नेहरू नगर पोलीसांकडून आरोपींना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2025

सोशल मीडियावर बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, नेहरू नगर पोलीसांकडून आरोपींना अटक


मुंबई - महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लीम धर्मा विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहणा-या राज्याबाहेरील दोन आरोपींना नैहरू नगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान झालेल्या या कारवाईबद्दल भीम आर्मीने पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

परभणी येथील भन्ते सारीपुत्त यांनी जात बौध्द, धर्म बौध्द लिहा हा वाॅट्सअप ग्रूप तयार केला होता. सदर ग्रूपची लिंक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली असता, या लिंकचा आधार घेत संतोषकुमार संगम वय ४३ झारखंड, अंकीत वर्मा वय १८ मध्य प्रदेश व नरेंद्र परायण सिंग वय ४० बिहार, हे तिघे या ग्रूपवर सहभागी झाले. सदर ईसमांनी या ग्रूपवर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लीम धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेल्या पोस्ट शेअर केल्या होत्या. सदर आक्षेपार्ह पोस्टबाबत भीम आर्मी या संघटनेचे कार्यकर्ते सुनील वाकोडे यांनी स्थानिक नेहरू नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करीत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आरोपींविरोधात गु. र. क्र. ४३८\२०२०. भादंवि ५०५(२), १५३(अ,ब) व २९५(अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र ठीकेकर यांनी या प्रकरणी कसोशीने तपास केला असता सिम कार्ड आणि मोबाईल बदलत, पोलीसांना सतत हुलकावणी देणा-या संतोषकुमार संगम व अंकीत वर्मा या दोन आरोपींना अटक केली. यातील तिसरा आरोपी नरेंद्र परायन सिंग हा मृत झाला असल्याचे पोलीसांनी सांगितले.

पोलीसांनी केलेल्या कारवाई नंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र ठीकेकर यांचे भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड, चेंबूर तालुका अध्यक्ष प्रवीण भोसले, सुनील वाकोडे संजय बचाटे यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. धर्माधर्मात तेढ निर्माण करणा-यांविरोधात कारवाई झाली तरच असल्या समाजविघातक प्रवृत्तींना आळा बसू शकेल असे गरूड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS