३-४ डिसेंबरला मुंबईतील १४ विभागात १५ टक्के पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2025

३-४ डिसेंबरला मुंबईतील १४ विभागात १५ टक्के पाणीकपात


मुंबई - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. या कारणाने बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू राहणार आहे.  

तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्‍याकामी काही कामे प्रस्‍तावित आहेत. त्‍यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्‍यक  आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्‍के घट होणार आहे. याचा परिणाम म्‍हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरा‍तील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात केली जाणार आहे. बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू राहणार आहे.  

संबंधित सर्व परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, या कालावधीत कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. दिनांक ३ डिसेंबर व ४ डिसेंबर २०२५ रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS