आरोग्य व्यवस्थेला नवी ऊर्जा; मुंबईत IAPSM–IPHA ची राज्यस्तरीय परिषद दिमाखात संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2026

आरोग्य व्यवस्थेला नवी ऊर्जा; मुंबईत IAPSM–IPHA ची राज्यस्तरीय परिषद दिमाखात संपन्न


मुंबई - सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील नव्या वाटा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्रामीण-शहरी आरोग्य दरी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (IAPSM) आणि इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (IPHA) यांच्या महाराष्ट्र शाखेची 27 वी संयुक्त राज्यस्तरीय परिषद नुकतीच सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रुग्णालय, मुंबई येथे उत्साहात पार पडली.

परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त शरद उघडे, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक येथील शैक्षणिक व अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. सचिन मुंबरे, एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख संचालक डॉ. शैलेश मोहिते तसेच जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्री-कॉन्फरन्स सीएमईने परिषदेची दमदार सुरुवात झाली. ‘वैद्यकीय संशोधनातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)’ या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करत डिजिटल हेल्थ आणि डेटा-आधारित आरोग्य धोरणांची दिशा स्पष्ट केली.

राज्यभरातून सुमारे 500 हून अधिक तज्ज्ञ, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी आणि आरोग्य अधिकारी या परिषदेत सहभागी झाले. असंसर्गजन्य आजार, प्राथमिक आरोग्यसेवा बळकटीकरण, आरोग्य समता, सार्वजनिक आरोग्य धोरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर 20 हून अधिक शास्त्रीय सत्रांमधून सखोल चर्चा झाली.

उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील समन्वय आणि संशोधनाची गरज अधोरेखित केली. उत्कृष्ट संशोधन निबंध आणि पोस्टर सादरीकरणांना पुरस्कार देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील नवोपक्रम, संशोधन आणि धोरणात्मक विचारांना चालना देत राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवण्याचा संकल्प या परिषदेतून व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS