मुंबई महापालिकेच्या स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड

Share This

मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या स्‍थायी समिती अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ पार पडल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.  

स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता आज दुपारी वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.

स्थायी समितीच्या सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रभाकर शिंदे : प्रदीर्घ राजकीय प्रवास - 
प्रभाकर शिंदे यांनी १९७३ साली शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये मुलुंड पूर्व शाखेचे उपशाखा प्रमुख, तर १९९२ मध्ये शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १९९४ मध्ये भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष झाले.

१९९७ मध्ये मुलुंड पूर्वमधून प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये महापौर परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. १९९९ आणि २००१ मध्ये बेस्ट समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. २००२ मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून निवड झाली आणि २००२ ते २००६ या काळात महापालिका सभागृह नेते म्हणून कार्य केले. २००७ मध्ये तिसऱ्यांदा नगरसेवक झाले.

२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करत चौथ्यांदा नगरसेवक झाले. २०१८ मध्ये चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली. २०२० मध्ये भाजपा गटनेतेपदी निवड झाली. २०२६ मध्ये पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी आपला राजकीय प्रभाव कायम राखला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages