‘सिग्नल शाळा’ उपक्रमांना समाजाचा हातभार आवश्यक – महापौर रितू तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2026

‘सिग्नल शाळा’ उपक्रमांना समाजाचा हातभार आवश्यक – महापौर रितू तावडे


मुंबई - बेघर, स्थलांतरीत व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ‘सिग्नल शाळा’ या अभिनव उपक्रमांना समाजातील सर्व घटकांचा हातभार मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले.

चेंबूर येथील अमर महाल परिसरात सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्ग उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या ‘सिग्नल शाळे’चे लोकार्पण महापौर तावडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २३ मार्च २०२६) झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अर्थसहाय्याने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या माध्यमातून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ठाणे व नेरूळ येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आलेल्या या संकल्पनेचा विस्तार आता मुंबईत करण्यात आला आहे.

महापौर तावडे म्हणाल्या की, शाळाबाह्य मुलांना एकत्र आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करणे हे मोठे आव्हान असते. मात्र ‘सिग्नल शाळा’ हा उपक्रम या दृष्टीने प्रभावी ठरत आहे. अशा प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी अभियंते, व्यावसायिक आणि क्रीडापटू बनले असून त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक स्थैर्य मिळत आहे.

मुंबईतील उड्डाणपुलांखाली व वाहतूक बेटांजवळ राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्वेक्षण करून अशा शाळांची संख्या वाढविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तसेच पावसाळ्यात शाळेच्या सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देत पालकांनी अधिकाधिक मुलांना या शाळांमध्ये पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे, नगरसेविका कशिश फुलवारिया, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त शंकर भोसले, उपशिक्षणाधिकारी मुख्तार शहा, समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे संचालक अजय जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राथमिक वर्गाचे उद्घाटन, नामफलक अनावरण तसेच रोबोटिक लॅब, विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, व्यवसाय व लघुउद्योग प्रशिक्षण केंद्रांची पाहणी करण्यात आली. सिग्नल शाळेच्या विशेष शिक्षण पद्धतीवरील कृती पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. प्राची जांभेकर यांनी या शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच आहार, तंत्रज्ञान व मानसिक स्थैर्य यांवरही भर दिला जात असल्याचे सांगितले. तर भटू सावंत यांनी भटके व स्थलांतरीत कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS