वांद्रे पश्चिमला जलवाहिनी जोडणीसाठी २९ मार्चला पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2026

वांद्रे पश्चिमला जलवाहिनी जोडणीसाठी २९ मार्चला पाणीपुरवठा बंद


मुंबई - वांद्रे पश्चिम येथे ७५० मिमी व्यासाची नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम प्रगतिपथावर असून, या जलवाहिनीची जोडणी शनिवार (दि. २८ मार्च) रात्री ११ ते रविवार (दि. २९ मार्च) सायंकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.

पाली हिल जलाशयातील पाणीपातळी सुधारण्यासाठी रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्शनदरम्यान ही नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तिच्या जोडणीसाठी सुमारे १६ तासांचे काम हाती घेतले जाणार आहे.

यामुळे संपूर्ण खार पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम तसेच वांद्रे पश्चिमेतील काही भागात रविवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. हिल रोड, पेरी रोड, कार्टर रोड, पालीमाला मार्ग, चिंबई, शेर्ली, रणवार गाव, पालीगाव आदी परिसरांनाही या बंदचा फटका बसणार आहे. तर खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण आणि आसपासच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच काही भागात शनिवारी रात्रीच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, पाणी काटकसरीने वापरावे तसेच पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS