
नागपूर - नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर आज काढण्यात आलेल्या विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्च्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. “आम्ही फकीर आहोत, कोणाला घाबरणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी धमक्यांना भीक न घालण्याचा इशारा दिला.
मोर्चाचे नेतृत्व करताना आंबेडकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे थेट प्रश्नांची सरबत्ती केली. कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला जाब विचारत, “ही विमाने नेमकी कुठे कोसळली? भारतात की पाकिस्तानात? आणि जर एखादे विमान पाकिस्तानात कोसळले असेल, तर त्या पायलटचे काय झाले?” असे सवाल उपस्थित केले.
देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाबींवर सरकारने पारदर्शकता दाखवावी आणि सैनिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. सनातनवादी विचारसरणीच्या लोकांनीही या मुद्द्यांवर पंतप्रधानांना प्रश्न विचारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
विरोधी पक्षांना उद्देशून बोलताना आंबेडकर म्हणाले, “जेलमध्ये टाकण्याची भीती किंवा दबावामुळे प्रश्न विचारणे थांबवू नका. लोकशाहीत सत्तेला प्रश्न विचारणे हा अधिकार आहे.” त्यांनी स्वतःलाही धमक्या मिळाल्याचा उल्लेख करत, “मी ना घाबरणार, ना झुकणार,” अशी भूमिका स्पष्ट केली. “माझ्याकडे कोणतीही मालमत्ता नाही, मी कधी भ्रष्टाचार केला नाही, तरीही मी सत्तेला उघड आव्हान देतो,” असे ते म्हणाले.
परराष्ट्र धोरणावर टीका करताना त्यांनी केंद्र सरकारवर अमेरिकेच्या प्रभावाखाली काम केल्याचा आरोप केला. इराणसारख्या देशांनी भारताला कठीण काळात साथ दिली असून, रुपयांमध्ये तेल पुरवण्याची तयारी दाखवली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. अशा मित्र देशांशी निष्ठा राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायलविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय सेना आणि वायुदल सक्षम असून भारताला कोणत्याही बाह्य मदतीची गरज नाही. तसेच, रशियाने अनेक वेळा भारताला मदत केली असून महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.
आपला विरोध कोणत्याही धर्म किंवा विशिष्ट समाजाविरोधात नसून केवळ आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध असल्याचे स्पष्ट करत, आंदोलनाचा चुकीचा अर्थ लावू नये, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी काँग्रेस, सीपीएमसह इतर विरोधी पक्षांना आवाहन करत, या आंदोलनाचे केंद्र दिल्लीत नेऊन लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आणावेत आणि केंद्र सरकारकडून उत्तरांची मागणी करावी, असे सांगितले. असे झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसेल, असा दावाही त्यांनी केला.
देशाची स्वातंत्र्य, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, पुढील १० ते १५ दिवसांत पंतप्रधानांकडे या सर्व मुद्द्यांवर उत्तरांची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:
Post a Comment