मुंबईत DRTB रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर, २०२५ मध्ये ५४ हजारांहून अधिक TB रुग्णांची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 March 2026

मुंबईत DRTB रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर, २०२५ मध्ये ५४ हजारांहून अधिक TB रुग्णांची नोंद


मुंबई - जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने क्षयरोग नियंत्रणाबाबत महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. औषध प्रतिरोधक क्षयरोग (DRTB) रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या ८ वर्षांत दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. २०१७ मध्ये DRTB बरे होण्याचा दर सुमारे ४० टक्क्यांवर होता, जो आता वाढून ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

वर्ष २०२५ मध्ये मुंबईत एकूण ५४,३९० क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ४८,८३५ रुग्ण मुंबईचे रहिवासी आहेत. या रुग्णांमध्ये ४० टक्के एक्स्ट्रा पल्मनरी, ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण आहेत. 

“Yes! We can end TB! – Led by countries, Powered by people” ही २०२६ सालची थीम असून, मजबूत राष्ट्रीय नेतृत्व आणि समाजाच्या सक्रिय सहभागातून क्षयरोग निर्मूलन साध्य करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

महापालिकेकडून क्षयरोग रुग्णांसाठी अत्याधुनिक निदान सुविधा, नवीन उपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य दिले जात आहे. शहरातील विविध आरोग्य संस्थांमध्ये ४५ CBNAAT आणि ३४ TruNAAT मशीनद्वारे मोफत व अचूक निदान केले जाते. तसेच पॅथोडिटेक्ट आणि Whole Genome Sequencing (WGS) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर वाढवला जात आहे.

औषध प्रतिरोधक क्षयरोगासाठी ३१ DRTB क्लिनिकमधून मोफत उपचार दिले जात असून ६ महिन्यांची BPaLM उपचार पद्धती राबवली जात आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत.

याशिवाय, ‘TB मुक्त भारत अभियान’ अंतर्गत १३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. क्षयरोग प्रतिबंधासाठी Cy-TB चाचणी, हँडहेल्ड एक्स-रे मशीन, तसेच निक्षय पोषण योजनेद्वारे रुग्णांना पौष्टिक आहार किट देण्यासारखे उपक्रमही राबवले जात आहेत.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मुंबईतील सर्व २६ विभागांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, होर्डिंग्स, रस्त्यावरील नाटके, आरोग्य चर्चा आणि जिंगल्सद्वारे नागरिकांना जागरूक केले जाईल.

दरम्यान, दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजन घटणे, रात्री घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महापालिका दवाखान्यात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS