मुंबईतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळणार; मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2026

मुंबईतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळणार; मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन


मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घरांच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अंतर्गत सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी २००८ व २०१५ च्या शासन निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले. येत्या अधिवेशनात या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सफाई कामगारांच्या घरांच्या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियनच्या वतीने आज (२३ मार्च रोजी) आझाद मैदान येथे मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घडवून आणली आणि चर्चेतून मार्ग काढण्यात यश मिळवले. त्यामुळे संभाव्य आंदोलन टळले असून कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय झाल्यास हजारो कुटुंबांना सुरक्षित, स्थिर आणि सन्मानजनक निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे कामगारांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे मुंबईतील सफाई कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याला मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कामगार संघटनांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव, यशवंत देसाई, अरुण नाईक आदी उपस्थित होते.

या बातम्याही वाचा...
डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी घरांची चावी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन, सफाई कामगारांचा सरकारला इशारा

घर हक्कासाठी सफाई कामगारांचा एल्गार; २३ मार्चला ‘वर्षा’ बंगल्यावर हजारोंचा मोर्चा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS