तीन वर्षांनंतर मुलींची आई-वडिलांशी भेट; सर्वहारा जन आंदोलनाची यशस्वी कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 March 2026

तीन वर्षांनंतर मुलींची आई-वडिलांशी भेट; सर्वहारा जन आंदोलनाची यशस्वी कारवाई


रोहा - रायगड जिल्ह्यातील वरवटणे (ता. रोहा) येथील वाघमारे कुटुंबातील दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी भेट घडून आली आहे. सर्वहारा जन आंदोलन संघटनेच्या प्रयत्नांमुळे ही सुटका शक्य झाली.

संतोष जानू वाघमारे, त्यांची पत्नी सुनीता वाघमारे आणि मुली अनिता व पूजा वाघमारे यांना सुमारे दहा वर्षांपूर्वी अनिल चव्हाण (रा. पत्र्याचा तांडा, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी कोळसा भट्टीच्या कामासाठी कर्नाटक येथे नेले होते. या कुटुंबाकडून दीर्घकाळ काम करून घेतले गेले, मात्र त्यांना योग्य मोबदला देण्यात आला नाही.

सततच्या त्रासाला कंटाळून संतोष वाघमारे व त्यांची पत्नी ऑक्टोबर २०२५ मध्ये तेथून पळून नागोठणे येथे परतले. मात्र, अनिता आणि पूजा या दोन्ही मुलींना अनिल चव्हाण यांनी आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यामुळे पालकांना मुलींना सोबत न घेता परतावे लागले.

या घटनेची माहिती सर्वहारा जन आंदोलन संघटनेकडे आल्यानंतर संघटनेने तत्काळ हस्तक्षेप करत कारवाई सुरू केली. सुरुवातीला अनिल चव्हाण यांनी मुली आपल्या ताब्यात असल्याचे नाकारले; मात्र संघटनेने कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्यांनी मुली आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केले.

त्यानंतर संघटनेच्या दबावामुळे अनिल चव्हाण यांनी रविवारी (दि. २२ मार्च २०२६) मंगळवेढा येथे दोन्ही मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर अनिता आणि पूजा यांची आई-वडिलांशी भावनिक भेट घडून आली.

या प्रकरणात सर्वहारा जन आंदोलन संघटनेच्या प्रयत्नांमुळे कुटुंब पुन्हा एकत्र आले असून, संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS