गॅस तुटवडा - ऑनलाईन फसवणूक वाढली, मालाडमध्ये काळाबाजारावर पोलिसांची धडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2026

गॅस तुटवडा - ऑनलाईन फसवणूक वाढली, मालाडमध्ये काळाबाजारावर पोलिसांची धडक कारवाई


मुंबई - आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर तुटवड्याचा फटका मुंबईकरांना बसत असताना, या परिस्थितीचा गैरफायदा घेत सायबर फसवणूक आणि काळाबाजाराचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे. एका बाजूला चेंबूर परिसरात ऑनलाईन फसवणुकीपासून नागरिकांना सावध करण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे, तर दुसरीकडे मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई करत १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे शहरात नागरिकांना एजन्सीबाहेर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर भामटे बनावट संदेश, लिंक आणि ओटीपीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी चेंबूर पोलिस ठाण्याच्या वतीने झोपडपट्टी भागात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी ओटीपी कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


दरम्यान, मालाड परिसरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १३ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १२ घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी दुप्पट दराने सिलेंडर विकून नागरिकांची लूट करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.


गॅस तुटवड्यामुळे छोट्या व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला असून अनेक खाऊगल्ल्या आणि स्टॉल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS