5 कोटींच्या निधीसह महापौर चषक; मुलांना मैदानाकडे वळवण्यावर भर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2026

5 कोटींच्या निधीसह महापौर चषक; मुलांना मैदानाकडे वळवण्यावर भर


मुंबई - मुलांचा वाढता ‘स्क्रीन टाईम’ कमी करून त्यांना मैदानी खेळांकडे आकर्षित करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांनी केली.

महापौर चषक क्रीडा स्पर्धा २०२५-२६ च्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला शहर आणि उपनगरांतील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर तावडे म्हणाल्या की, डिजिटल युगात मुलांचे लक्ष मोबाईल आणि स्क्रीनकडे अधिक झुकले आहे. त्यामुळे मैदानी खेळांपासून त्यांचा दूराव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर चषक स्पर्धा मुलांना पुन्हा मैदानाकडे वळवण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. क्रीडांगणे कमी शुल्कात उपलब्ध करून देणे, मैदानांच्या शुल्कात सवलत देणे आणि तयारीसाठी तीनऐवजी चार महिन्यांचा कालावधी देण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.

या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महापौरांनी स्पष्ट केले की, कोविडनंतर प्रथमच या स्पर्धांचे आयोजन होत असल्यामुळे नव्या आणि जुन्या सर्व क्रीडा संघटनांना समान संधी दिली जाईल. तसेच शैक्षणिक संस्थांची मैदाने स्पर्धांसाठी उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाईल.

दरम्यान, पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करत उपमहापौरांनी महापौर चषकाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS