ग्रामीण रोजगाराला चालना; दोन खाजगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 March 2026

ग्रामीण रोजगाराला चालना; दोन खाजगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता


मुंबई - राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

नव्याने मान्यता देण्यात आलेल्या विद्यापीठांमध्ये लातूर येथील पाशा पटेल स्किल टेक युनिव्हर्सिटी तसेच पुणे येथील फ्युएल स्किल टेक एंटरप्रेन्यूअरशिप युनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे. या विद्यापीठांद्वारे अत्याधुनिक आणि उद्योगाभिमुख कौशल्य शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले की, नव्या युगातील तंत्रज्ञानाधारित कौशल्यांची गरज लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यात कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

फ्युएल विद्यापीठात बँकिंग, फायनान्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रातील पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तर पाशा पटेल विद्यापीठात पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, हवामान बदल यांसह मीडिया मॅनेजमेंट, ब्रँडिंग आणि जाहिरात क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत.

या खाजगी कौशल्य विद्यापीठांमुळे शासनावर आर्थिक भार न येता विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण उपलब्ध होणार आहे. उद्योग आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केल्याने कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक स्तरावरच रोजगारक्षम प्रशिक्षण मिळून स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत होऊन राज्यातील कौशल्याधारित शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

विधान परिषदेनंतर हे विधेयक विधानसभेतही मंजूर झाल्यानंतर या दोन्ही विद्यापीठांच्या कार्यवाहीचा मार्ग मोकळा होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS