ANM प्रकरणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप; २७ मार्चला विभाग कार्यालयांवर मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ANM प्रकरणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप; २७ मार्चला विभाग कार्यालयांवर मोर्चा

Share This

मुंबई - ANM (Attendance Management) प्रक्रियेतील त्रुटींमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सुमारे २५ हजार कामगारांच्या वेतनात मोठी कपात झाल्याने संताप उसळला असून, या विरोधात शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभाग कार्यालय, रुग्णालय आस्थापना व यानगृह मुख्य कार्यालयांवर प्रचंड मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

म्युनिसिपल मजदूर युनियनने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक कामगाराच्या एप्रिल महिन्याच्या वेतनातून सुमारे ४ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत रक्कम कापण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निवडणूक कालावधीत काम केलेल्या कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही पैसे सर्रास कापण्यात आले आहेत. तसेच CL आणि EL रजा घेतलेल्या कर्मचाऱ्यांचेही वेतन कपातीत गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही संपूर्ण बाब आस्थापना विभागाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. फेस रिडिंग प्रणालीतील अडचणी, इंटरनेट न मिळणे यांसारख्या तांत्रिक कारणांमुळे उपस्थितीची नोंद व्यवस्थित न झाल्याचा फटका कामगारांना बसत असल्याचे सांगण्यात आले. “कामगारांनी रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करूनही त्यांचे वेतन कापले जात असेल, तर हा मोठा अन्याय आहे,” अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

वेतन कपातीमुळे कामगारांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. घरखर्च, वीजबिल, मुलांच्या शाळा- कॉलेजची फी, तसेच कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. याचबरोबर, एप्रिल महिन्यात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांवरही याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर, आस्थापना विभागाला जाब विचारण्यासाठी व वेतन कपातीचा निषेध करण्यासाठी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रमुख सल्लागार अॅड. महाबळ शेट्टी, अध्यक्ष अशोक जाधव, 
सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई व कोषाध्यक्ष शरद राघव यांनी केले आहे.

“काम करूनही पगार कापला जात असेल, तर हे सहन केले जाणार नाही. सर्व कामगारांनी एकजुटीने लढा द्यावा,” असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

इतर संघटनांचाही आंदोलनाचा इशारा -
महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, दि म्युनिसिपल मजदुर युनियन तसेच इतर कामगार संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. वेतनातून कोणतीही कपात करायची असल्यास किमान एक महिना आधी सूचना देणे आवश्यक असल्याचे यापूर्वी आयुक्तांसोबतच्या बैठकीत मान्य झाले होते, अशी आठवणही संघटनांनी करून दिली. रोखून धरलेले संपूर्ण वेतन तात्काळ अदा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना आर्थिक फटका बसत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अन्याय दूर करावा,” अशी मागणी संघटनांचे पदाधिकारी ऍड. प्रकाश देवदास, बाबा कदम व डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांच्यासह दि म्युनिसिपल मजदुर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.

ही बातमीही वाचा ...
पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रोखल्याने संताप उसळला; संघटनांचा आंदोलनाचा इशारा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages