मुंबईत २० टक्के पाणीकपात; नवीन बांधकामे, जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2026

मुंबईत २० टक्के पाणीकपात; नवीन बांधकामे, जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद


मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाणी बचतीसाठी आणखी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. १७ जून २०२६ पासून औद्योगिक, व्यावसायिक आणि स्पोर्ट्स क्लब आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येणार असून नवीन बांधकामांना जलजोडण्या देणे स्थगित करण्यात आले आहे. तसेच सर्व जलतरण तलावांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने यापूर्वी १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने आणि धरणांतील उपलब्ध पाणीसाठा १०.३५ टक्क्यांवर घसरल्याने अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार या उपाययोजना राबविण्यात येत असून उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नवीन बांधकामांसाठी कोणतीही जलजोडणी पुढील आदेशापर्यंत मंजूर केली जाणार नाही. विद्यमान बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित केल्या जाणार आहेत. तसेच वाढीव किंवा अतिरिक्त जलजोडणीसाठी येणारे अर्जही सध्या प्रलंबित ठेवले जाणार आहेत.

महापालिकेने नागरिक, संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages