प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते PM-VBRY अंतर्गत ₹2,400 कोटींचे वितरण, मुंबईत मंत्री लोढा यांची उपस्थिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते PM-VBRY अंतर्गत ₹2,400 कोटींचे वितरण, मुंबईत मंत्री लोढा यांची उपस्थिती

Share This

मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) अंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे सुमारे ₹2,400 कोटींच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करण्यात आले. PM-VBRY अंतर्गत हे प्रोत्साहन वितरण 15 लाखांहून अधिक व्यक्तींसाठी अतिरिक्त रोजगाराला चालना देण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.

देशव्यापी जनजागृती आणि लाभवितरण मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील 200 ठिकाणी समांतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, मुंबई (दादर) यांच्या वतीने वरळी येथील एचएसएनसी विद्यापीठामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जनजागृती व लाभार्थी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना लोढा म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली PM-VBRY योजना ही देशातील रोजगारनिर्मितीला नवी दिशा देणारी ठरत आहे. या योजनेमुळे युवकांना औपचारिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, नियोक्त्यांनाही रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी अशा योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.”

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी रोजगार-संलग्न प्रोत्साहन (Employment Linked Incentive - ELI) योजना असून, औपचारिक रोजगाराला प्रोत्साहन देणे, प्रथमच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांना आधार देणे आणि अतिरिक्त रोजगारनिर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.

₹99,446 कोटींच्या एकूण तरतुदीसह, PM-VBRY चा उद्देश दोन वर्षांच्या कालावधीत देशभरात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती सुलभ करणे हा आहे. यापैकी अंदाजे 1.92 कोटी लाभार्थी हे औपचारिक कार्यबलात प्रथमच प्रवेश करणारे असतील, अशी अपेक्षा आहे.

मुंबई विभागामध्येही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, EPFO मुंबई-1 (बांद्रा) विभागाने PM-VBRY च्या भाग-अ अंतर्गत 39,439 लाभार्थ्यांना ₹25.44 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित केली आहे. तसेच भाग-ब अंतर्गत 1,815 लाभार्थ्यांना ₹110.61 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे.

रोजगारनिर्मिती, कार्यबलाचे औपचारिकीकरण आणि सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार या दिशेने PM-VBRY हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ही योजना प्रभावी योगदान देत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages