मुंबईतील डबेवाल्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ₹२५ हजारांची मदत, महापौरांची घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2026

मुंबईतील डबेवाल्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ₹२५ हजारांची मदत, महापौरांची घोषणा


मुंबई / JPN NEWS - 
मुंबईच्या श्रमसंस्कृतीची आणि विश्वासार्हतेची ओळख असलेल्या डबेवाल्यांच्या विविध मागण्यांना आता महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी महापौर वैद्यकीय सहायता निधीतून ₹२५ हजारांची मदत तत्काळ देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली.

मुंबई डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (२७ जुलै) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात महापौर रितू तावडे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. डबेवाल्यांच्या मागण्या महानगरपालिकेच्या विहित कार्यपद्धतीनुसार मांडून त्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महापौरांनी दिली.

डबेवाला भवनाचे भाडे माफ करण्याची मागणी - 
डबेवाला संघटनेने महापौर आणि महापालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये वांद्रे पश्चिम येथील रिझवी महाविद्यालय परिसरातील डबेवाला भवन अर्थात मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र महापालिकेने निःशुल्क उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच डबेवाला भवनासाठी आतापर्यंत आकारण्यात आलेले महापालिकेचे सर्व भाडे विशेष बाब म्हणून माफ करावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

प्रमुख रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र सायकल पार्किंग - 
मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांजवळ डबेवाल्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित सायकल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबईच्या लोकल रेल्वे व्यवस्थेचा वापर करून दररोज डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांसाठी सुरक्षित पार्किंगची सुविधा महत्त्वाची असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चर्चगेटमधील ऐतिहासिक ठिकाण विकसित करण्याची मागणी -
चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील डब्यांच्या देवाण-घेवाणीचे ऐतिहासिक ठिकाण ‘मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र’ (टुरिस्ट पॉईंट) म्हणून विकसित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. देश-विदेशातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना मुंबईच्या या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, हा त्यामागील उद्देश आहे. डबेवाला भवन परिसरातील रस्त्याला संघटनेचे संस्थापक कै. महादू हावजी बच्चे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

‘डबेवाल्यांची परंपरा पुढील पिढीनेही सक्षम करावी’ - 
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या सुमारे १३० वर्षांच्या परंपरेचा गौरव केला. डबेवाल्यांची विश्वासार्हता आणि कार्यपद्धती मोठी असून वारकरी संप्रदायाशी जोडलेल्या या संघटनेने मुंबईच्या संस्कृतीत मानाचे स्थान मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी माणसाचा अभिमान असलेली ही संघटना आणि तिची पुढील पिढी अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य अपेक्षित आहे, असे भारतीय यांनी नमूद केले.

या बैठकीला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विविध समित्यांचे अध्यक्ष, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त प्रशांत गायकवाड तसेच मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन आणि डबेवाला संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

महापौर रितू तावडे यांनी संघटनेच्या सर्व मागण्यांचा नियमानुसार पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर नोंदणीकृत डबेवाल्यांसाठी ₹२५ हजारांच्या वैद्यकीय मदतीची घोषणा ही या बैठकीतील महत्त्वाची बाब ठरली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS