
मुंबई / JPN NEWS -
वडाळा येथील एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयात मराठी सांस्कृतिक संघाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. २५ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठलनामाचा गजर केला.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाची आकर्षक सजावट, रांगोळी, रंगीबेरंगी पताका आणि सांस्कृतिक नृत्याने परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते महाविद्यालयाबाहेरील परमेश्वरन मार्गावर काढण्यात आलेली 'ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी'. एसआयडब्ल्यूएस प्राथमिक शाळेने या दिंडीसाठी सुंदर पालखी उपलब्ध करून दिली होती. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे दिंडीत सहभागी करून घेण्यासाठी शिक्षकांनी विशेष व्यवस्था केली.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मनाली लोंढे, मराठी सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा डॉ. संगीता राजेश काशिद आणि प्रयोगशाळा कर्मचारी नाखवा यांनी विठ्ठलभक्तीची सुमधुर गीते सादर केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भजन आणि कीर्तन सादर करून वातावरणात भक्तिरस निर्माण केला. रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभिषेक यांनी गाऱ्हाणे सादर केले.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून ध्वनियंत्रणा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध विभागातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रसाद आणि फराळाची व्यवस्था करण्यासाठी योगदान दिले. यामध्ये फराळी कचोरी, पेढे, केळी, साबुदाणा खिचडी, वेफर्स, राजगिरा लाडू आणि लस्सी आदींचा समावेश होता.
कार्यक्रमानंतर महाविद्यालय परिसराची स्वच्छता आणि आवराआवरही तत्परतेने करण्यात आली. प्रतिमा मॅडम, मंजू मॅडम, सुचित्रा मॅडम आणि सुरज सर यांनी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली. मराठी सांस्कृतिक संघाच्या सदस्या तृप्ती, डॉ. गौरी आणि अदिती यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विविध व्यवस्थांची जबाबदारी सांभाळली.
प्राचार्य डॉ. मनाली लोंढे यांचे मार्गदर्शन, महाविद्यालय व्यवस्थापनाचे सहकार्य तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित सहभागामुळे आषाढी एकादशीचा हा सोहळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.


No comments:
Post a Comment