‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेलचा राज्यभर विस्तार; शाळा-महाविद्यालयांत नशामुक्ती समित्या स्थापन होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2026

‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेलचा राज्यभर विस्तार; शाळा-महाविद्यालयांत नशामुक्ती समित्या स्थापन होणार


मुंबई / JPN NEWS - 
अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी मुंबईत राबविण्यात येणाऱ्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात नशामुक्तीची जनचळवळ उभारण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या निर्णयाची माहिती दिली. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे मॉडेल संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलांवर लक्ष - 
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात होणारे संशयास्पद किंवा चिंताजनक बदल वेळेत ओळखून त्यांना आवश्यक समुपदेशन उपलब्ध करून देणे, हे समित्यांचे महत्त्वाचे काम असणार आहे.

याशिवाय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधणे तसेच आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांना संबंधित तज्ज्ञांकडे मार्गदर्शनासाठी संदर्भित करणे, अशी जबाबदारीही समित्यांवर सोपविण्यात येणार आहे.

२०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट - 
केंद्र सरकारने २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने विविध विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई तसेच व्यापक जनजागृती केली जात आहे.

महाराष्ट्रातही व्यसनमुक्तीची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षभर जनजागृतीपर उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, समुपदेशन कार्यक्रम आणि संवादात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

३० जुलैला ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ - 
मुंबईतील वरळी डोम येथे ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ होणार आहे. हे केवळ एका दिवसाचे अभियान नसून वर्षभर चालणारी जनचळवळ म्हणून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या अभियानात विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) तसेच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.

‘व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी सहभागी व्हावे’ - 
व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या या लोकचळवळीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक जनजागृतीसोबतच विद्यार्थ्यांना योग्य वेळी समुपदेशन आणि मदत मिळाल्यास व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून त्यांना रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS