CCMP पात्र BHMS डॉक्टरांना MMC नोंदणी देण्यास BMC MARDचा तीव्र विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2026

CCMP पात्र BHMS डॉक्टरांना MMC नोंदणी देण्यास BMC MARDचा तीव्र विरोध


मुंबई / JPN NEWS - 
CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला BMC MARDने तीव्र विरोध दर्शविला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या (Modern Medicine) शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक निकषांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता आणू नये, अशी भूमिका BMC MARDने घेतली आहे.

BMC MARDच्या म्हणण्यानुसार, Modern Medicine ही पुराव्यावर आधारित वैद्यकीय प्रणाली असून त्यासाठी MBBSचे 5.5 वर्षांचे शिक्षण, अनिवार्य इंटर्नशिप आणि त्यानंतरचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण आवश्यक असते. त्यामुळे केवळ एका वर्षाचा ब्रिज कोर्स हा MMC नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक कौशल्याच्या समकक्ष मानता येणार नाही, असा दावा संघटनेने केला आहे.

होमिओपॅथीला विरोध नाही, ‘मिक्सोपॅथी’ला विरोध - 
BMC MARDने स्पष्ट केले आहे की, संघटनेचा होमिओपॅथी किंवा अन्य मान्यताप्राप्त वैद्यकीय पद्धतींना विरोध नाही. मात्र, विविध वैद्यकीय पद्धतींचे शिक्षण व उपचारपद्धती एकत्रित करून ‘मिक्सोपॅथी’ला प्रोत्साहन देण्यास आणि वैद्यकीय शिक्षण व नियामक मानकांमध्ये कोणतीही तडजोड करण्यास विरोध असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

प्रत्येक वैद्यकीय पद्धतीची स्वतंत्र ओळख कायम राहणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांना ज्या वैद्यकीय पद्धतीत डॉक्टरने औपचारिक आणि आवश्यक प्रशिक्षण घेतले आहे, त्याच पद्धतीत उपचार घेण्याचा अधिकार असावा, अशी भूमिका BMC MARDने मांडली आहे.

‘रुग्णांची सुरक्षितता आणि सार्वजनिक विश्वास महत्त्वाचा’ -
महाराष्ट्र सरकारने MMCच्या नोंदणी व्यवस्थेची विश्वासार्हता आणि अखंडता कायम ठेवावी, अशी मागणी BMC MARDने केली आहे. रुग्णांची सुरक्षितता, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास या बाबींचा विचार करून सरकारने प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, असे संघटनेने म्हटले आहे.

या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास BMC MARD इतर वैद्यकीय संघटनांसोबत कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने अधिक तीव्र पावले उचलण्यास बाध्य होईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS