कुर्ला येथे भूस्खलन; दोन जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना ४ लाख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2026

कुर्ला येथे भूस्खलन; दोन जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना ४ लाख


मुंबई JPN NEWS - कुर्ला (पश्चिम) येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ परिसरात बुधवारी पहाटे भूस्खलनाची दुर्घटना घडली. डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग लगतच्या २ ते ३ घरांवर कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पहाटे सुमारे ३.४८ वाजता दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवण्यासाठी बचाव साहित्याचा वापर करण्यात येत असून, सुमारे ५० BMC कर्मचारी बचावकार्यात सहभागी आहेत. मुंबई अग्निशमन दलाने पहाटे ४.३२ वाजता दुर्घटनेला लेव्हल-२ घोषित केले.

घटनास्थळाचा परिसर अत्यंत अरुंद असून, तेथे पोहोचण्याचा मार्ग केवळ एका व्यक्तीला जाता येईल इतका अरुंद आहे. त्यामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी व्यक्ती अडकल्या आहेत का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या साहिल अन्सारी (२८) आणि मोहम्मद समीर (१४) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.

महापौरांकडून घटनास्थळी पाहणी - 
दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. तसेच बचावकार्य अधिक वेगाने आणि सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखून करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना ५० हजारांची मदत - 
कुर्ला येथील या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत, तर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.

घटनास्थळी BMC अधिकारी-कर्मचारी, मुंबई अग्निशमन दल, NDRF, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि इतर यंत्रणा बचावकार्यात सहभागी आहेत. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS