
मुंबई JPN NEWS : पादचाऱ्यांसाठी पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत भांडुप रेल्वे स्थानक परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत पालिकेने ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करून पदपथ मोकळे केले आहेत.
भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरात मोठ्या प्रमाणावर पादचारी वर्दळ असते. मात्र, पदपथांवर अनधिकृत स्टॉल्स आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला.
‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात भांडुप परिसरातील १४ पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास ११ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे. स्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी आता पदपथावरील मार्ग मोकळा होण्यास सुरुवात झाली आहे.
या कारवाईसाठी पालिकेने ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार आणि ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले होते. कारवाईदरम्यान अनधिकृत स्टॉल्स तसेच पदपथावरील अडथळे हटविण्यात आले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे आणि सहायक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईमुळे भांडुप स्थानक परिसरातील पादचारी कोंडी कमी होण्यास तसेच लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना अडथळामुक्त पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पदपथांवर अनधिकृतपणे दुकाने, स्टॉल्स, बांधकाम साहित्य किंवा इतर कोणतेही अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिक आणि व्यावसायिकांना केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.


No comments:
Post a Comment