टेरेसच्या गळतीने घराचे नुकसान? दुरुस्तीचा खर्च सोसायटीला भरावा लागणार! सहकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2026

टेरेसच्या गळतीने घराचे नुकसान? दुरुस्तीचा खर्च सोसायटीला भरावा लागणार! सहकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई JPN NEWS - सोसायटीच्या ताब्यात असलेल्या टेरेस किंवा सामायिक भागातून होणाऱ्या पाणीगळतीमुळे सभासदाच्या घराचे नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी झटकता येणार नाही. गळतीमुळे फ्लॅटच्या आतील भागाचे नुकसान झाले असल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित गृहनिर्माण सोसायटीलाच करावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईतील सहकारी न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे टेरेस आणि सामायिक संरचनेतून होणाऱ्या गळतीमुळे त्रस्त असलेल्या फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवडी येथील हिरजी बाग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सभासद सुनील दाली यांच्या फ्लॅटमध्ये २०१५ पासून टेरेसवरून पाणी गळत होते. त्यामुळे घराच्या छताला तडे जाण्यासह मोठ्या प्रमाणावर अंतर्गत नुकसान झाले. हे नुकसान दुरुस्त करण्याचा खर्च सोसायटीने करावा, अशी मागणी दाली यांनी केली होती.

मात्र, सोसायटीने हा प्रश्न ‘फ्लॅटमधील अंतर्गत दुरुस्तीचा’ असल्याचे सांगत जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे दाली यांनी आपल्या हक्कासाठी कायदेशीर लढा सुरू केला. तब्बल पाच वर्षांच्या या लढ्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला.

‘फ्लॅटच्या आत नुकसान झाले म्हणून जबाबदारी सभासदाची नाही’ - 
न्यायाधीश व्ही. आर. कुलकर्णी यांनी सोसायटीचा दावा फेटाळताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. फ्लॅटमधील नुकसान नेमके कोणत्या कारणामुळे झाले, यावर जबाबदारी निश्चित होते. जर नुकसान सभासदाच्या स्वतःच्या जागेतील स्वतंत्र कारणामुळे झाले असेल तर सोसायटीला जबाबदार धरता येणार नाही. मात्र, सोसायटीच्या नियंत्रणाखाली असलेल्या टेरेस किंवा सामायिक संरचनेतून होणाऱ्या पाणीगळतीमुळे फ्लॅटचे नुकसान झाले असेल, तर केवळ नुकसान फ्लॅटच्या आतील भागात झाले आहे, या कारणावरून सोसायटीला जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तीन महिन्यांत दुरुस्ती करण्याचे आदेश - 
न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी हिरजी बाग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला दुरुस्तीचे आदेश दिले. टेरेसवरील पाणीगळतीमुळे सुनील दाली यांच्या फ्लॅटमध्ये झालेले अंतर्गत नुकसान तीन महिन्यांच्या आत दुरुस्त करून देण्याचे निर्देश सोसायटीला देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे टेरेस, गच्ची, छत किंवा अन्य सामायिक संरचनेतून होणाऱ्या पाणीगळतीमुळे घरांचे नुकसान सहन करणाऱ्या सभासदांच्या हक्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘फ्लॅटच्या आतली दुरुस्ती म्हणजे सभासदाचीच जबाबदारी’ असा सरसकट दावा सोसायट्यांना करता येणार नाही, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

पावसाळ्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये टेरेस आणि छताच्या गळतीमुळे रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा निर्णय अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्या फ्लॅटधारकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS